अण्णा नेमके कुणाच्या बाजूने : शिवसेनेचा सवाल

 

मुंबई : प्रतिनिधी । ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाला स्थगिती दिल्याने त्यांच्यावर टीका होत असतांनाच आता शिवसेनेनेही त्यांच्यावर हल्लाबोल करत अण्णा नेमके कुणाच्या बाजूने आहेत हे स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.

कृषी कायद्यांविरोधात समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाची इशारा दिला होता. मात्र, शुक्रवारी त्यांनी आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली. अण्णा हजारे यांच्या या निर्णयावर शिवसेनेनंही सामना अग्रलेखातून शंका उपस्थित करणारे काही प्रश्न विचारले आहेत. “शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अण्णा हजारे यांनी निर्णायक उपोषणाची घोषणा केली होती व अण्णांनी उपोषण करू नये म्हणून महाराष्ट्रातील भाजपा पुढारी राळेगणसिद्धीत जाऊन अण्णांशी चर्चा करीत होते. हे चित्र तसे गमतीचेच होते आणि घडलेही अपेक्षेप्रमाणेच.

केंद्र सरकारला आपण शेतकऱ्यांशी संबंधित १५ मुद्दे दिले आहेत. त्यावर केंद्र सरकार नेमणार असलेल्या उच्चस्तरीय समितीमध्ये योग्य ते निर्णय होतील, असा आपल्याला विश्वास वाटतो म्हणून आपण आपले उपोषण स्थगित करीत आहोत,’ असे अण्णांनी सांगितले. अण्णांनी उपोषणाचे अस्त्र बाहेर काढायचे आणि नंतर ते म्यान करायचे असे यापूर्वीही घडले आहे. त्यामुळे आताही ते घडले तर त्यात अनपेक्षित असे काही नाही,” अशी शंका शिवसेनेनं बोलून दाखवली आहे.

मुळात अण्णा हजारे जे उपोषण करू इच्छित होते, त्यामागचा नेमका हेतू काय आहे? कृषी कायदे रद्द करावेत असे आंदोलक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अण्णा हजारे यांचे उपोषण शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी होते काय हे स्पष्ट झालेले नाही. अण्णांचे उपोषण त्यासाठी असते तर अण्णांना मोदी सरकारविरोधात उघड भूमिका घ्यावी लागली असती. राळेगणमध्ये जे भाजपाचे पुढारी मनधरणी वगैरे करण्यासाठी आले त्यांना तसे स्पष्ट शब्दांत सांगावे लागले असते. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना अण्णा दोन वेळा दिल्लीत आले व त्यांनी जंगी आंदोलन केले. या आंदोलनाच्या मशालींवर तेल ओतण्याचे काम तेव्हा भाजपा करीत होता, पण गेल्या सात वर्षांत मोदी राज्यात नोटाबंदीपासून लॉक डाऊनपर्यंत अनेक निर्णयांमुळे जनता बेजार झाली, पण अण्णांनी कूसही बदलली नाही असा आरोप होत राहिला. म्हणजे आंदोलने फक्त काँग्रेस राजवटीतच करायची काय? बाकी आता रामराज्य अवतरले आहे काय? अण्णा आज एकाकी पडले आहेत. राजकीय पक्षांनी त्यांना वेळोवेळी वापरून घेतले. त्यात अण्णांच्या शरीराची प्रचंड झीज झाली. उपोषण करणे व ती पुढे रेटणे ही साधी गोष्ट नाही. पुन्हा अण्णांचे वय पाहता त्यांनी जिवाचा धोका पत्करू नये. मागच्या उपोषणाचे परिणाम अण्णांच्या शरीराच्या अनेक अंगांना भोगावे लागत आहेत. पण अण्णांनी एखादे आंदोलन छेडणे यास आजही महत्त्व आहेच,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

 

Protected Content