अवजड वाहतुकीमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरात अवजड वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अनेकदा विरोध होऊनही पोलीस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. विशेषतः आज एकादशी असून, मुक्ताईनगरमध्ये हजारो वारकरी जमा झाले असतानाही मुख्य रस्त्यावर वाहतूक नियंत्रणासाठी एकही पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी उपस्थित नसल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

रोजच्या अवजड वाहतुकीमुळे मुक्ताईनगरकरांना त्रास सहन करावा लागतो. त्यातच, एकादशी आणि बाजाराचा दिवस असल्याने शहरात मोठी गर्दी असतानाही अवजड वाहनांची वर्दळ नेहमीप्रमाणे सुरू आहे. सामान्यतः, एकादशी, बाजारपेठेचा दिवस किंवा इतर कोणताही मोठा कार्यक्रम शहरात असल्यास, पूर्वसंध्येपासूनच महामार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असतो. मात्र, आज अशी कोणतीही व्यवस्था दिसून आली नाही.

या अनियंत्रित वाहतुकीमुळे वारकऱ्यांसह स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. “एखादा मोठा अपघात झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का?” असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. पोलीस प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी मुक्ताईनगरमधील नागरिकांनी केली आहे.