अडावदमध्ये विद्यार्थ्यांनी घेतले योगाचे धडे


अडावद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अडावद येथील शामराव येसो महाजन विद्यालय आणि आदर्श प्राथमिक शाळेत २१ जून रोजी ११ वा ‘आंतरराष्ट्रीय योग संगम’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ७:३० वाजता श्री संत सावता माळी शैक्षणिक व सामाजिक संस्थेद्वारे संचालित या दोन्ही शाळांच्या प्रांगणात विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून देत विविध योगासने शिकवण्यात आली.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक आर. के. पिंपरे यांनी ‘एक पृथ्वी एक आरोग्य यासाठी योग’ या संकल्पनेचे महत्त्व विषद केले आणि निरोगी आरोग्याचा मंत्र दिला. योग शिक्षक एस.टी. महाजन आणि पी.आर. माळी यांनी विद्यार्थ्यांना योगाचे प्रात्यक्षिक करून दाखवले. वॉर्मअप आणि सूर्यनमस्काराने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर ताडासन, त्रियक ताडासन, वक्रासन, वृक्षासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, वीरभद्रासन, पादहस्तासन, वज्रासन, बालासन, पवनमुक्तासन, बद्धकोणासन, भुजंगासन, विरासन, शवासन यांसारखी विविध आसने घेण्यात आली.

आसनांनंतर भस्त्रिका प्राणायाम, कपालभाति प्राणायाम, बाह्य प्राणायाम, अनुलोम-विलोम प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, उद्गीथ प्राणायाम यांसारख्या प्राणायामाचे प्रकार शिकवण्यात आले. कार्यक्रमाची सांगता शांत मंत्राने करण्यात आली. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांसोबत सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही यात सक्रिय सहभाग घेतला.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक आर. के. पिंपरे, उपशिक्षक व्ही. एम. महाजन, एस. जी. महाजन, एम. एन. माळी, पी. आर. माळी, एस. बी. चव्हाण, एस. के. महाजन, पी. एस. पवार, लिपिक सी. एस. महाजन, ईश्वर मिस्तरी, रवींद्र महाजन, अशोक महाजन, तसेच आदर्श प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक डी. बी. महाजन, आर. जे. महाजन, एस. टी. महाजन, वाय. एल. साळुंखे, डी. आर. वाघ, कामिनी चौधरी, पूनम सुतार यांनी विशेष परिश्रम घेतले.