चोपड्याच्या महात्मा गांधी शिक्षण मंडळाचा सुवर्ण महोत्सव : विविध कार्यक्रमांचे आयोजन

6a2902cc e37f 4cbc a021 bfad236e1cd1

 

चोपडा प्रतिनिधी| येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या स्थापनेला जून २०१९ मध्ये ५० वर्ष पूर्ण झाले आहेत. संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त वर्षभर संस्थेतर्फे विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

दि.२४ बुधवार रोजी कोल्हापूर येथील जिल्हा परिषदेचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांचे नवभारताच्या निर्मितीसाठी युवकांचे योगदान या विषयावर व्याख्यान होणार आहे. या प्रसंगी महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सुवर्ण महोत्सवाचे उदघाटन होणार आहे. चोपडा तालुक्यातील नागरिकांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी जून १९६९ मध्ये माजी आमदार डॉ.सुरेश पाटील व सहकारी मित्रांनी महात्मा गांधी शिक्षण मंडळाची स्थापना केली. सुरुवातीच्या कालखंडात अतिशय खडतर परिस्थितीत संस्थेने उच्च माध्यमिक,पदवी, इतर डिप्लोमा कोर्सेसला सुरुवात केली.

 

 

उच्च शिक्षित व कौशल्य पूर्ण विद्यार्थ्यांना नोकरीची संधी महात्मा गांधी शिक्षण मंडळाने उपलब्ध करून दिली. सुरुवातीच्या काळात स्वतःची इमारत नसल्याने विज्ञान आणि कला व वाणिज्य विभागातील वर्ग प्रताप विद्या मंदिर आणि म्युनिसिपल हायस्कुल मध्ये वर्ग भरत असतांना संस्थेने यावल रोड लगत ३५ एकर जमीन घेऊन तिथे स्वतःची इमारत उभी केली. सर्व प्रथम महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री स्वर्गीय शरदचंद्रिका सुरेश पाटील व विधान सभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी मानसेवी प्राध्यापक म्हणून ज्ञानार्जनाचे काम केलेले आहे.सध्या या संस्थेत बालवाडी पासून तर पदवी,पदव्युत्तर उच्च शिक्षण,डीटीएड, तंत्रनिकेतन,औषधनिर्माण शास्राची पदविका, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण,नर्सिंगचे शिक्षण आयटीआय सह आदी शैक्षणिक कोर्सेचे दालन उपलब्ध करून दिले आहे. संस्थेतून दरवर्षी विविध विभागात जवळपास दहा हजार विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत.महात्मा गांधी शिक्षण मंडळ खान्देशात कौशल्यपूर्ण आणि सर्वांगीण शिक्षण देणारी संस्था म्हणून नावलौकीक मिळविला आहे.

 

गेल्या पन्नास वर्षापूर्वी लावलेले संस्थारूपी रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे.ही चोपडे करांच्या दृष्टीकोनातून अभिमानाची बाब आहे. शिक्षण मंडळाचा सुवर्ण महोत्सव संस्थेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अड. भैय्यासाहेब संदीप पाटील,सचिव डॉ.स्मिताताई पाटील,उपाध्यक्षा आशाताई पाटील, सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाचे समन्वयक तथा माजी उपप्राचार्य प्रा.डी. बी.देशमुख व कार्यकारी मंडळाचे संचालक यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

Protected Content