चहार्डी सरपंचाविरुद्ध अविश्‍वास ठराव पारीत

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील येथील सरपंचावरील अविश्‍वास प्रस्ताव १२ विरुद्ध ४ मतांनी पारीत करण्यात आला आहे.

चहार्डी येथील सरपंच उषाबाई रमेश पाटील यांच्या विरोधात तहसीलदार अनिल गावित यांच्याकडे ग्रामपंचायत सदस्या प्रमिला प्रकाश पाटील यांच्यासह १३ सदस्यांनी अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावावर १७ ग्रामपंचायत सदस्यांपैकी १३ सदस्यांच्या स्वाक्षर्‍या होत्या. त्यानुसार २२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता तहसीलदार गावीत यांनी ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केली होती. या वेळी ग्रामपंचायत सदस्या संगीता तुळशीराम कोळी यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र विहित कालावधीत सादर न केल्याने त्यांना अविश्‍वास प्रक्रियेत सहभागी होता आले नाही. अविश्‍वास ठरावाच्या बाजूने ग्रामपंचायत सदस्या प्रमिला प्रकाश पाटील, किरण विश्‍वनाथ चौधरी, लिलाबाई जंगलू भिल, संजय प्रताप मोरे, संदीप दत्तात्रय पाटील, तुळशीराम धनराज कोळी, जगदीश निंबा पाटील, प्रशांत नथू पाटील, वर्षा ज्ञानेश्‍वर पाटील, मीना अशोक पाटील, कल्पना योगेश महाजन, इंदुबाई रघुनाथ वारडे यांनी मतदान केले. तर सरपंचांकडून चार जणांनी समर्थन केले.

यामुळे अविश्‍वास ठरावात १६ सदस्यांनी सहभागी करून घेत अविश्‍वास ठरावाच्या बाजूने १२ विरुद्ध ४ सदस्यांनी मतदान केल्याने सरपंच उषाबाई पाटील यांच्यावरील अविश्‍वास ठराव मंजूर केल्याची माहिती तहसीलदार अनिल गावीत यांनी दिली. दरम्यान, याला न्यायालयाने स्थगिती दिल्याची माहिती सरपंचांतर्फे देण्यात आली आहे.

Protected Content