वैजापूर वनपरिक्षेत्र सातपुडा पर्वत परीसरात बिजारोपण

chopda news 1

चोपडा प्रतिनिधी । विवेकानंद विद्यालयातील नववीतील विद्यार्थी आणि हरित सेनेतर्फे सीड बँक उपक्रमांतर्गत वैजापूर वनपरिक्षेत्र सातपुडा पर्वताच्या परीसरात येथे 6 हजार बिजरोपणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी 50 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोदविला होता.

हेमराज पाटील यांच्या मार्गदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांनी मार्च ते जुलै या कालावधीत सुमारे 6000 वेगवेगळ्या फळझाडांच्या व दीर्घायू झाडांच्या बीज जमा केल्या होत्या. जमा केलेल्या बियांचे विद्यार्थ्यांनी पर्वतरांगांमध्ये खुरपे व टोचाच्या साहाय्याने जमीनीत रोपण केले. या परिसरातील प्लॉस्टिक घनकचरा गोळा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेट अहवाल व प्रश्नावली नमुने लिहिण्यासाठी भूगोल शिक्षकांनी मार्गदर्शन केले. वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांनी परिसरातील डोंगर रांगा हरित करण्याचा निर्धार केला असून याबाबत वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक वसंत पवार यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच वैजापूर वनपरिक्षेत्राचे वनपाल बी.डि.कुवर यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचा वाढता ऱ्हास व त्याचे दुष्परिणाम याविषयी माहिती देऊन डोंगर रांगेतील वृक्षसंपदा व वन्यजीव विविधतेतील महत्व यावर अभ्यासपूर्ण संवाद साधण्यात आला.

वृक्षलागवड व संवर्धनाचे पटवून दिले महत्व
हरित सेना सदस्य अनिल शिंपी यांनी वृक्षलागवड व संवर्धनाचे महत्व सांगितले. शिबीर प्रमुख व पक्षीमित्र हेमराज पाटील यांनी सूत्रसंचालन करुन विद्यार्थ्यांनाकडून वसुंधरा संवर्धनाची प्रतिज्ञा म्हणून घेतली. शिबिराच्या मध्यंतरात विद्यार्थ्यांनी नदी किनाऱ्यालगत वनभोजनाचा आस्वाद घेतला. तसेच वनविभागातर्फे विद्यार्थ्यांना बिस्किटे देण्यात आलीत. सर्व प्रथम भरत जैन या विद्यार्थ्याने सगळ्यात जास्तबिया जमा केल्यात. ‘झाडे लावूयात, निसर्गसंवर्धन करूयात,’ घोषणा देत विद्यार्थ्यांनी शिबिराची सांगता केली.

यांची होती उपस्थिती
उपक्रम राबवताना वनअधिकारी कुवर, वनरक्षक सी.एन.सूर्यवंशी व एस.एन.बारेला तसेच उपशिक्षक शिवाजी सनेर, शशिकांत बाविस्कर, विद्या सपकाळे, कर्मचारी राजू चौधरी व भरत पाटील यांनी परिश्रम घेतले. तसेच उपक्रमासाठी मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांचे नियोजन व मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ.विजय पोतदार, संस्थापक अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव ॲड.रवींद्र जैन व सर्व शिक्षकांनी शिबिरार्थी इयत्ता नववीचे विद्यार्थी तसेच सहभागी शिक्षकांचे मनःपूर्वक कौतुक व अभिनंदन करण्यात आले आहे.

Protected Content