चोपडा प्रतिनिधी । येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील मानसशास्त्र विभाग व ‘मानसमित्र समुपदेशन केंद्र यांच्यातर्फे ‘मानसमित्र समुपदेशन विद्यार्थी मंडळ’च्या उदघाटनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला यामिनी चौधरी, विजया धनगर, ललिता पाटील, बबिता पाटील व पूनम पाटील या विद्यार्थीनींनी स्वागतगीत सादर केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ.आर.आर.पाटील यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी हे उपस्थित होते. यावेळी प्रमुख वक्ते एन.एस.कोल्हे (भूगोल विभाग प्रमुख), माया शिंदे, डॉ.आर.आर.पाटील, एम.एल.भुसारे, डी.डी.कर्दपवार, यु.एन.पाटील, सुनिता पाटील आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी पवन नायदे, प्रसाद पवार या विद्यार्थ्यांनी आपले मनोगते व्यक्त केली.
यावेळी प्रमुख वक्ते एन.एस.कोल्हे आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, समुपदेशन याची गरज आज मोठ्या प्रमाणात दिसून येते कारण बदललेली जीवनशैली व विभक्त कुटुंब पद्धती यामुळे कुटुंबातील संवाद कमी होतो. त्यामुळे मानसिक समस्या व्यक्त करण्यास हक्काचा असा खांदा उपलब्ध होत नाही व माणूस मनातल्या मनात त्या समस्यांचे दमन करतो. म्हणून योग्य व्यक्तीजवळ भावना व्यक्त केल्या पाहिजेत तसेच आपल्या लोकांविषयी विश्वास व आदराची भावना ठेवायला पाहिजे. जेणेकरून मानसिक समस्या सोडविण्यास मदत होईल. तसेच विद्यार्थ्यांनी सोशल मिडीयाचा उपयोग जाणीवपूर्वक केला पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी सौ.यु.एन.पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना मार्गदर्शन व समुपदेशन यातील फरक समजावून सांगितला. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना मित्र म्हणून आपल्या भावना व्यक्त कराव्यात, जेणेकरून मानसिक समस्या सोडविण्यास मदत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी म्हणाले की, समुपदेशनाची गरज आज मोठ्या प्रमाणात प्रत्येक क्षेत्रात दिसून येते आहे कारण बदललेल्या जीवन शैलीमुळे अनेक समस्या निर्माण होतात. म्हणून त्या समस्या सोडविण्यासाठी समुपदेशक आपणास मदत करीत असतो. म्हणून मनात कोणतीही शंका न ठेवता समुपदेशकाकडे आपण गेले पाहिजे असा सल्ला त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला त्याबरोबरच मार्गदर्शक सूचना त्यांनी यावेळी केल्या.
या कार्यक्रमाप्रसंगी दि.१७ ऑगस्ट २०१९ रोजी जिव्हाळा संस्था नाशिक यांच्यातर्फे ‘राज्यस्तरीय समाजभूषण’ पुरस्कार मिळाल्याबद्दल मा.प्रमुख वक्ते एन.एस.कोल्हे यांच्या हस्ते एम.एल.भुसारे (मराठी विभाग) यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अश्विनी राजेंद्र पाटील यांनी केले तर आभार पूनम हिलाल पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाला व्ही.जी.सोनवणे, विशाल पाटील, स्नेहा राजपूत,सौ.पूजा पुन्नासे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, प्राध्यापक बंधू-भगिनी तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.