चाळीसगाव प्रतिनिधी । उन्मेष पाटील यांनी चाळीसगाव तालुक्यात सातत्याने विधायक कामांना विरोध करत दोन नंबरवाल्यांना पाठींबा दिला आहे. उद्या हीच स्थिती जळगाव लोकसभा मतदारसंघात होणार असल्याने आपला त्यांचा विरोध असल्याने प्रतिपादन करत आज चित्रसेन पाटील यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
काही दिवसांपासून जय अंबाजी ग्रुपचे चेअरमन चित्रसेन पाटील आणि उन्मेष पाटील हे सोबत असल्याचा फोटो व्हायरल होत आहे. अर्थात दोन्ही पाटील एकत्र असल्याचे दर्शविण्यात येत आहे. या पार्श्वभूमिवर, आज चित्रसेन पाटील यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, उन्मेष पाटील हे शिखंडीप्रमाणे निवडणूक लढवत असल्याचा आरोप चित्रसेन पाटील यांनी केला. ते म्हणाले की, २०१४ साली उन्मेष पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी विरोधी उमेदवार पप्पूदादा गुंजाळ यांना पाठींबा दिल्याचा फोटो व्हायरल करून विजय मिळवला होता. आता याच प्रमाणे त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपदेखील चित्रसेन पाटील यांनी केला. मीदेखील लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होतो. मी वरिष्ठ नेत्यांना भेटून पक्षाकडे उमेदवारीदेखील मागितली होती. मात्र उमेदवारी स्मिताताई वाघ यांना मिळाली. त्यांचा अर्ज दाखल करण्यासाठी मीदेखील उपस्थित होतो. मात्र काही दिवसांमध्येच त्यांचे तिकिट कापून उन्मेष पाटील यांचे नाव समोर आले. त्यांच्या प्रचारास प्रारंभ होत असतांना मी जळगावात होतो. मात्र त्याप्रसंगी फक्त ३० सेकंदापर्यंत भेट घेतली. येथेच फोटो काढून तो सोशल मीडियात व्हायरल करण्यात आला. मात्र उन्मेष पाटील यांना माझा पाठींबा नाही. कारण आमदार पाटील यांनी सातत्याने चांगल्या कामांना विरोध केला. मी चाळीसगाव तालुक्यातून लोकसहभागातून बेलगंगा साखर कारखाना सुरू केला. यासाठी पाटील यांनी अनंत अडचणी निर्माण केल्याचा आरोप चित्रसेन पाटील यांनी केला.
चित्रसेन पाटील पुढे म्हणाले की, उन्मेष पाटील यांनी चाळीसगावात चांगल्या कामांना विरोध करून दोन नंबरवाल्याची पाठराखण केली आहे. उद्या जळगाव लोकसभा क्षेत्रातही हीच स्थिती येण्याची शक्यता आहे. यामुळे या निवडणुकीत आपण त्यांच्या सोबत नसल्याची स्पष्ट भूमिका त्यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे. बेलगंगा कारखाना सुरू करून उन्मेष पाटलांच्या दाव्याची पोलखोल केल्यानंतर आता जय अंबाजी ग्रुपचे चेअरमन चित्रसेन पाटील यांनी ऐन निवडणुकीत त्यांच्या विरोधात शड्डू ठोकल्यामुळे लोकसभा निवडणुकीतली लढत रंजक स्थितीत पोहचली आहे.
पहा : चित्रसेन पाटील नेमके काय म्हणालेत ते !