मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | 2020 मध्ये भारत-चीन सीमावादामुळे भारतीय सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव टिकटॉक, शीन, यूसी ब्राउझर यांसह 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली होती. यानंतर 2022 मध्ये पबजी, गरेना फ्री फायर यांसारख्या लोकप्रिय गेमिंग अॅप्ससह एकूण 200 पेक्षा अधिक चिनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली. मात्र, या बंदीनंतर काही अटी व नियमांसह अनेक चिनी अॅप्स आता भारतात परत येत आहेत.
चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेले शीइन अॅप रिलायन्स रिटेलच्या माध्यमातून भारतात परतले आहे. शीइन इंडिया फास्ट फॅशन या नावाने 1 फेब्रुवारी रोजी पुन्हा लाँच करण्यात आलेले हे अॅप आता भारतीय नियमांचे पालन करत आहे. यातील सर्व उत्पादने देशांतर्गत तयार केली जातील आणि ग्राहकांचा डेटा केवळ भारतातच साठवला जाईल.
झेंडर जे एक लोकप्रिय फाइल शेअरिंग अॅप आहे, आता “Xender: File Share, Share Music” या नव्या नावाने अॅपल अॅप स्टोअरवर उपलब्ध आहे. Taobao आता Taobao Mobile या नावाने परतले आहे. टनटन, जे एक डेटिंग अॅप आहे, त्याने आपले नाव बदलून “TanTan – Asian Dating App” असे ठेवले आहे. अनेकांना प्रश्न पडतो की सरकारने या अॅप्सवरील बंदी उठवली आहे का? तर याचे उत्तर आहे नाही. सरकारने बंदी हटवलेली नाही, मात्र या अॅप्सच्या पुनरागमनामागे विविध कारणे आहेत. काही अॅप्सनी त्यांच्या मालकीत बदल केले आहेत, तर काहींनी भारतीय कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे. याशिवाय, काही अॅप्सनी त्यांच्या डेटा सुरक्षा धोरणात बदल करून नव्या अटींनुसार पुन्हा बाजारात प्रवेश केला आहे.
सर्वाधिक लोकप्रिय अॅप टिक टॉकच्या पुनरागमनाबाबतही चर्चांना उधाण आले आहे. सध्या तरी टिकटॉक भारतात परत येण्याची कोणतीही अधिकृत घोषणा नाही. मात्र, उद्योग क्षेत्रातील घडामोडी पाहता भविष्यात काही आश्चर्यकारक घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या काही काळात भारत-चीन संबंधांमध्ये सुधारणा झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळेच काही अॅप्सना भारतात परत येण्याची संधी मिळाली आहे. मात्र, राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सरकार अजूनही सजग आहे.