Home क्राईम बोदवड तरुणाच्या मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांचे विधानपरिषदेत स्पष्टीकरण ; आ. एकनाथ खडसे...

बोदवड तरुणाच्या मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांचे विधानपरिषदेत स्पष्टीकरण ; आ. एकनाथ खडसे यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर

0
20


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बोदवड येथील तरुण सुनील दैवे यांच्या मृत्यू प्रकरणावरून विधानपरिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर लेखी उत्तर दिले आहे. या प्रकरणात पोलिसांनी आवश्यक ती कारवाई केली असून पाच आरोपींपैकी तीन आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. तसेच चौकशी पूर्ण करून ११ जून २०२६ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याचे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले.

बोदवड (जिल्हा जळगाव) येथील हनुमान नगर परिसरातील रहिवासी सुनील दैवे यांचा मारहाणीत जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना २४ मार्च २०२६ रोजी समोर आली होती. या प्रकरणातील काही आरोपी फरार असल्याने बोदवड आणि मुक्ताईनगर तालुक्यात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. आरोपींना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी तहसील कार्यालयावर मोर्चाही काढला होता.

या पार्श्वभूमीवर आमदार एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करून प्रकरणातील तपास आणि आरोपींवरील कारवाईबाबत शासनाची भूमिका जाणून घेण्याची मागणी केली होती. त्यास उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी निवेदनात संपूर्ण तपासाची माहिती सभागृहासमोर मांडली. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ मार्च २०२६ रोजी रात्री सुनील दैवे यांना मारहाण झाल्यानंतर बोदवड पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर उपचारादरम्यान सुनील दैवे यांचा मृत्यू झाल्यामुळे या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम १०५ चा समावेश करण्यात आला.

या प्रकरणातील एकूण पाच आरोपींपैकी तीन आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. एका आरोपीला न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला असून, एका विधी संघर्ष बालकाला बालसुधारगृहात ठेवण्यात आल्यानंतर न्यायालयाने मुक्त केले आहे. तपासादरम्यान आरोपींनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी आवश्यक पुरावे संकलित करून ११ जून २०२६ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी दिली. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयीन प्रक्रियेनुसार पुढील सुनावणी होणार आहे. या प्रकरणाकडे बोदवड आणि मुक्ताईनगर तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले असून, दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे.


Protected Content

Play sound