मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गेल्या अनेक महिन्यांपासून राजकीय विजनवासात असलेले राष्ट्रवादीचे मातब्बर नेते छगन भुजबळ यांची राज्य मंत्रीमंडळात वापसी झाली असून त्यांनी आज कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.
या संदर्भातील वृत्त असे की, आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. आज सकाळी राजभवनात त्यांचा शपथविधी पार पडला. ते पुन्हा राज्य मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून दाखल झाले आहेत. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर झालेल्या रिक्त जागेवर भुजबळ यांची वर्णी लागली आहे.
आज पहाटे झालेल्या शपथविधीच्या प्रसंगी राज्यपाल, मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री, आमदार तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भुजबळ यांच्या समर्थकांची उपस्थिती होती. त्यांना धनंजय मुंडे यांच्याकडे असलेल्या अन्न आणि नागरी पुरवठा या खात्याची जबाबदारी मिळणार आहे. तर, या माध्यमातून भुजबळ यांच्या सारख्या दिग्गज नेत्याची राज्य मंत्रीमंडळात वापसी झाली आहे.