बुद्धिबळविश्वात शोकसागर! अमेरिकन ग्रँडमास्टर डॅनियल नरोडित्स्की यांचे अल्पवयात निधन


नवी दिल्ली – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ विश्वातून एक धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे आघाडीचे ग्रँडमास्टर डॅनियल नरोडित्स्की यांचे वयाच्या अवघ्या २९व्या वर्षी अचानक निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने केवळ अमेरिकेच नाही तर संपूर्ण जागतिक बुद्धिबळ क्षेत्रात शोककळा पसरली आहे. नुकतीच अमेरिकेतील चार्लोट बुद्धिबळ केंद्राने अधिकृत निवेदन जारी करत ही माहिती दिली. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून, त्यांच्या कुटुंबीयांकडूनही कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

डॅनियल नरोडित्स्की हे केवळ एक खेळाडू नव्हते, तर बुद्धिबळ विश्वात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व मानले जात होते. अवघ्या १८व्या वर्षी त्यांनी ग्रँडमास्टरचा किताब पटकावला होता आणि त्यानंतर त्यांच्या नावावर अनेक जागतिक स्पर्धांमध्ये भक्कम कामगिरीची नोंद राहिली. डॅनियलने वयाच्या १४व्या वर्षीच ‘Mastering Positional Chess’ हे पहिले पुस्तक प्रकाशित करून आपली लेखक म्हणूनही ओळख निर्माण केली होती. बुद्धिबळातील त्यांच्या विश्लेषणात्मक शैलीला जगभरात मान्यता मिळाली होती.

डॅनियलचे वडील व्लादिमीर हे मूळचे युक्रेनचे, तर आई लीना अझरबैजानमधील होत्या. त्यामुळे त्यांचे बालपण बहु-सांस्कृतिक वातावरणात गेले. त्यांनी अनेक भाषांमध्ये संवाद साधण्याची आणि विविध संस्कृती आत्मसात करण्याची क्षमता लहान वयातच विकसित केली होती. डॅनियल हा केवळ क्लासिकल खेळात नव्हे, तर ब्लिट्झ आणि रॅपिड फॉरमॅट्समध्येही निष्णात होता. काही आठवड्यांपूर्वीच त्यांनी अमेरिकन नॅशनल ब्लिट्झ चॅम्पियनशिप जिंकत आपली श्रेष्ठता पुन्हा अधोरेखित केली होती.

डॅनियल नरोडित्स्की हे बुद्धिबळ सामन्यांचे थेट समालोचन करणारे तसेच ऑनलाइन शिक्षण देणारे एक लोकप्रिय व्यक्तिमत्व होते. त्यांच्या YouTube आणि Twitch चॅनेलवर लाखो फॉलोअर्स होते. त्यांचा विचारशील, स्पष्ट आणि विनोदी शैलीतील समालोचनामुळे ते नवोदित खेळाडूंमध्ये खूपच लोकप्रिय होते. त्यांनी हजारो तरुण बुद्धिबळपटूंना प्रेरणा दिली.

त्यांच्या निधनानंतर भारतीय बुद्धिबळाचे जेष्ठ दिग्गज आणि माजी विश्वविजेते विश्वनाथन आनंद यांनीदेखील ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. आनंद म्हणाले, “ग्रँडमास्टर डॅनियल नरोडित्स्की यांच्या निधनाची बातमी ऐकून मी खूपच स्तब्ध झालो आहे. ते एक उत्कृष्ट बुद्धिबळ समालोचक, शिक्षक आणि सज्जन व्यक्ती होते. त्यांचे आयुष्य खूपच लवकर संपले. त्यांच्या कुटुंबियांप्रति माझ्या संवेदना. बुद्धिबळ जगताला त्यांची नक्कीच उणीव भासेल.”

संपूर्ण बुद्धिबळ समुदायासाठी डॅनियल नरोडित्स्की यांचे निधन एक अपूर्णनीय हानी आहे. त्यांनी बुद्धिबळ जगतात आपल्या कार्यातून एक वेगळी ओळख निर्माण केली होती. अल्प वयात इतकी उच्च शिखरे गाठूनही त्यांची नम्रता आणि विनम्रता ही सर्वांना भावणारी होती. त्यांच्या जाण्याने केवळ एक ग्रँडमास्टरच नाही, तर एक संवेदनशील विचारवंत आणि प्रेरणादायक शिक्षक गमावल्याची भावना सर्वत्र दिसून येते.