धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील पिल्लू मश्जिद जवळ राहणाऱ्या तरूणाला भारतीय रेल्वे खात्यात सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत बनावट कागदपत्रे तयार करून त्यावर रेल्वे मंत्रालय नावाचे खोटे शिक्के मारून वेळोवेळी १३ लाख रूपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनिवारी २ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, धरणगाव शहरातील पिल्लू मश्जिद जवळ मोहंमद जुबेर मोहंमद युसुफ वय २७ हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. भारतीय रेल्वे खात्यात नोकरीला लावून देतो असे सांगून संशयित आरोपी सतिश गोकूळ पाटील, मनिषा सतिष पाटील, प्रमिला गोकुळे पाटील सर्व रा. जुनोवणे ता.अमळनेर, प्रविण गोकुळ महाले रा.पारोळा, रामनारायण नेवाळकर, अरूण (पुर्ण नाव माहित नाही) दोन्ही राहणार नाशिक आणि राजकुमार (पुर्ण नाव माहित नाही) रा. दिल्ली यांनी संगनमत करून मोहंमद जुबेर याला बनावट कागदपत्रे तयार करून त्यावर रेल्वे मंत्रालय नावाचे खोटे शिक्के मारून वेळोवेळी १३ लाख रूपये घेतले. त्यानंतर बनावट रेल्वेच्या नावाने ऑर्डरची प्रत देवून फसवणूक केली. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर माहंमद जुबेर मोहमंद युसूफ याने धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार शनिवारी २ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात वरील सर्वांवर गुन्हा दाख्शल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ सुधिर चौधरी हे करीत आहे.