नशिराबाद ग्रामपंचायतीत अपहार करणाऱ्या माजी सरपंचाला अटक; एलसीबीची कारवाई

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथील तत्कालीन सरपंचाने शासनाच्या स्वच्छ भारत अभियानातर्ंगत वैयक्तिक शौचालयांसाठी मिळणारे अनुदानात अपहार केल्याप्रकरणी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून तत्कालीन सरपंच हा गेल्या पाच वर्षापासून फरार होता. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या संशयीत आरोपीला कल्याण येथून मोठया शिताफीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

खिलचंद दगडू रोटे (वय ४१) रा. नशिराबाद असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, नशिराबादचे तत्कालीन सरपंच खिलचंद दगडू रोटे हा सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी त्यांनी दोन शासकीय कर्मचार्‍यांच्या मदतीने शासनाच्या स्वच्छ भारत अभियानातर्ंगत वैयक्तिक शौचालय बांधकामात १२ लाख ८४ हजारांचा अपहार केला होता. या प्रकरणी तत्कालीन वरिष्ठ सहाय्यक लेखा शेख रईस शेख मुनाफ व नशिराबाद ग्रामविकास अधिकारी दिलीप रामा शिरतुरे यांना सेवेतून निलंबीत करण्यात आले होते. तर तत्कालीन सरपंच खिलचंद रोटे हा तेव्हा पासून फरार होता. दरम्यान जिल्हा परिषदेकडून रोटे यांना नोटीस बजावून अपहारातील ५० टक्के रकमेचा भरणा करण्याबाबत नोटीस बजावली होती. मात्र त्यांनी भरणा न केल्याने त्यांच्याविरुद्ध ग्रमाविस्तार अधिकारी यांच्या फिर्यादीवरुन रोटे यांनी ६ लाख ४२ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यापासून रोटे हा फरार असल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला खिलचंद रोटे हा कल्याण पश्‍चिम येथील एका कंपनीत नोकरीस असून तो साई चौक परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार हे पथक तीन दिवसांपासून मुंबई, कल्याण, व ठाणे या ठिकाणी ठाण मांडून होते. दरम्यान, रोटे हा साईचौकात येताच पोलिसांनी सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या.  ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील जितेंद्र पाटील, अकरम शेख, नितीन बाविस्कर, संदिप सावळे यांच्या पथकाने केली.

 

Protected Content