दौलत नगरात टाकलेल्या दरोड्यातील दोन अट्टल गुन्हेगारांना अटक (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । मोहाडी रोडवरील दौलत नगरात टाकलेल्या दरोड्यातील दोन गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. न्यायालयाने दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. 

किशोरसिंग उर्फ टकल्या रामसिंग टाक रा. गुरुगोविंदसिंग नगर, जालना व रणजितसिंग जीवनसिंग जुनी रा. राजीवगांधी नगर, जळगाव अशी अटकेतील संशयितांची नावे आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील मोहाडी रस्त्याला लागूनच दौलतनगर येथे पिंटू बंडू इटकरे यांच्या घरी पहाटेच्या सुमारास दरवाजा तोडून तोंडाला मास्क बांधलेल्या पाच संशयितांनी प्रवेश केला होता. तसेच धारदार शस्त्राचा धाक दाखवून इटकरे यांच्यासह त्यांची पत्नी व मुलाला जीवे मारण्याची धमकी देत संशयितांनी घरातील रोकड व दागिणे असा एकूण १८ लाख ५ हजारांचा लुटला होता. त्यानंतर इटकरे यांचा मोबाईल सोबत घेवून संशयित पसार झाले होते. 

याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल आहे. तब्बल सहा महिन्यांपासून स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक या दरोड्यातील संशयितांचा सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक माहितीच्या आधारावर शोध घेत होते. सीसीटीव्ही कैद झालेली चारचाकी ही हरिविठ्ठल नगरकडे जात असल्याचे दिसून आल्यानंतर या परिरातील राजीव गांधी नगरातील रेकार्डवरील गुन्हेगार रणजीतसिंग याच्याबाबत धागा गसवला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्यावर त्याने कबुली देत इतर संशयितांची नावे सांगितली होती. त्यानुसार यात करनसिंग रा. परभणी, तेजासिंग नरसिंग बावरी, ज्वालासिंग रामसिंग कलाणी व किशोरसिंग रामसिंग टाक तिघे रा. जालना हे संशयित निष्पन्न करण्यात आले होते. त्यापैकी किशोरसिंगला पोलिसांनी अटक केली असून इतर संशयित फरार आहेत. अटकेतील संशयित किशोरसिंग व रणजीतसिंग या दोघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

यांनी केली कारवाई

पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले, सहाय्यक फौजदार रवी नरवाडे, संदीप पाटील, संतोष मायकल, रणजीत जाधव, श्रीकृष्ण खंडेराव , परेश महाजन, मुरलीधर बारी, संजय हिवरकर, राजेश मेंढे, सुनील दामोदरे, जयंत चौधरी, महेश महाजन, किरण चौधरी, प्रवीण मांडोळे, दिपक चौधरी यांनी अहोरात्र मेहनत घेवून संशयितांचा शोध घेवून अटक केली आहे.

Protected Content