मुंबई प्रतिनिधी । एटीएमच्या माध्यमातून होणारी चोरी रोखण्यासाठी देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या स्टेट बँकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. स्टेट बँकेने नव्या वर्षात दि.1 जानेवारीपासून एटीएममधून पैसे काढण्यासाठी ओटीपी अनिवार्य केले आहे. स्टेट बँकेचे डेबिट कार्ड वापरून तुम्ही रात्री आठ ते सकाळी आठ या वेळेत एटीएममधून पैसे काढले तर तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी येईल. हा ओटीपी एटीएममध्ये टाकल्यावरच ग्राहकांना पैसे मिळतील.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नव्या नियमानुसार तुम्हाला जर रात्री 8 ते सकाळी 8 म्हणजेच या 12 तासांत केव्हाही पैसे एटीएमद्वारे काढायचे असतील तर तुमच्या बँकेत रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP पासवर्ड येईल. हा पासवर्ड तुम्ही एकदाच वापरू शकता. हा ओटीपी तुम्हाला टाकून तुमच्या खात्यातून पैसे काढता येऊ शकतात. हा नियम 10 हजार रुपयांपेक्षा अधिक पैसे काढणाऱ्यांसाठी बंधनकारक असणार आहे. याची अंमलबजावणी 1 जानेवारी 2020 पासून करण्यात येणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे.
तुम्ही रात्री पैसे काढत असाल तर बँक तुम्हाला तुमच्या सजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओटीपी सेंड करेल. हा ओटीपी नंबर कुणालाही सांगू नये. तो एकदाच वापरला जाऊ शकतो. त्यासाठी काही सेकंदाचा कालावधीही मर्यादीत असतो. ही प्रक्रिया अन्य बँकेतील एटीएममध्ये सध्या तरी काम करणार नाही. असे बँकेकडून सांगण्यात आलं आहे. एटीएममधून अथवा बँकेतून होणारे बनावट ट्रॅन्झॅक्शन आणि ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी ह्या नियमाची अंमलबजावणी केली जात आहे. यासोबतच तुम्ही 5 पेक्षा जास्त वेळा ATM मधून पैसे काढत असाल आणि तुमचं सॅलरी अकाऊंट नसेल तर तुम्हाला बँकेकडून काही शुल्क आकारण्यात येणार आहे. हा नियम आताही लागू आहेच मात्र नव्या वर्षातही हा नियम कायम असणार आहे.