चंद्रयान 2 चा आज पहिला संदेश

2

नवी दिल्ली प्रतिनिधी । २२ जुलैला आकाशात भरारी घेऊन चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण करणाऱ्या चांद्रयान २ ने यात्रेचे २५ दिवस संपल्यानंतर एक संदेश इस्रोला दिला आहे. चांद्रयान २ हळूहळू चंद्राच्या कक्षेत प्रवेश करत असून ७ सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार असल्याची माहिती या संदेशातून मिळाली आहे.

भारतीय वेळेनुसार, आज पहाटे २ वाजून २१ मिनिटांनी चांद्रयान२ने पृथ्वीची कक्षा सोडली. इस्रोने ट्रान्स लूनर इंजेक्शन यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. यानाचे लिक्विड इंजिन १२०३ सेकंदासाठी फायर करण्यात आले. यानंतर गेले २२ दिवस पृथ्वीच्या कक्षेत असलेले चांद्रयान-2 चंद्राच्या दिशेने झेपावले आहे. ‘इस्रो’चे अध्यक्ष के. सिवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘चांद्रयान-2’ हे पुढील सहा दिवस चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू ठेवणार आहे. जवळपास ४.१ लाख किलोमीटरचा प्रवास करून ते २० ऑगस्टला अंतिम कक्षेत पोहोचेल. त्यानंतर २७ दिवसांनी ७ सप्टेंबरला ते चंद्रावर उतरणार आहे. पृथ्वीची कक्षा सोडल्यानंतर यासंदर्भात एक संदेश चांद्रयान २ ने दिला आहे. ‘नमस्कार ! मी चांद्रयान२ आहे. मला देशाच्या नागरिकांना हेच सांगायचे होते की, आतापर्यंतचा प्रवास उत्तम झाला असून 7 सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मी उतरणार आहे. मी कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी संपर्कात राहा’ इस्रोने ट्विटच्या माध्यमातून या संदेशाची माहिती दिली आहे. चंद्रावर पोहोचण्यासाठी यानाला ४० दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागणार असला तरी चंद्रावर उतरण्यापूर्वीची शेवटची १५ मिनिटं अत्यंत महत्त्‍वाची असणार आहेत.

Protected Content