हुतात्मा यश देशमुखच्या कुटुंबियांना एक कोटींसह सर्व शासकीय मदत मिळणार- मंत्री द्वयींची घोषणा

चाळीसगाव प्रतिनिधी । दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान यश डिगंबर देशमुख यांच्या कुटुंबियांना एक कोटी रूपयांसह सर्व शासकीय मदत मिळणार असल्याची घोषणा आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व कृषी मंत्री दादा भुसे यांनी त्यांना आदरांजली अर्पण करतांना केली.

जम्मू काश्मीर मधील श्रीनगर येथे २६ नोव्हेंबर रोजी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. या घटनेत जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील यश देशमुख हा जवान शहीद झाला होता. आज या वीर जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

आज त्यांना निरोप देतांना राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे हे देखील उपस्थित होते. या दोन्ही मंत्र्यांनी शहीद जवान यश देशमुख याच्या पार्थिवाचे वंदन करून त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यानंतर आदरांजली अर्पण करतांना कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी वीर जवान यश देशमुख यांच्या परिवाराला एक कोटी रूपयांची मदत करण्यात येईल अशी घोषणा केली. तर यानंतर बोलतांना ना. गुलाबराव पाटील यांनी यश देशमुख यांचे बलीदान व्यर्थ जाणार नसल्याचे सांगत त्यांच्या कुटुंबियांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ प्रदान करण्यात येईल असे सांगितले.

दरम्यान, याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील व ना. दादाजी भुसे यांच्यासह खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी सभापती पोपट भोळे यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी, लष्करी व पोलीस जवान आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

shraddhanjali

Protected Content