आ. मंगेश चव्हाण म्हणतात, मला घर नको, रूग्णांच्या आप्तांसाठी निवारा उभारा !

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एकीकडे राज्यातील आमदारांना घरे देण्याच्या सरकारच्या निर्णयावरून टीका होत असतांना आमदार मंगेश चव्हाण यांनी हे घर स्पष्टपणे नाकारत, याऐवजी मुंबईत येणार्‍या रूग्णांच्या आप्तांसाठी निवारा उभारण्याची मागणी केली आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील तीनशे आमदारांसाठी मुंबईत घरे उपलब्ध करून देण्याची घोषणा केली असून यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. यावरून सोशल मीडियातून सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. या संदर्भात चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्याला या योजनेतून घर नको असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे.

आमदार मंगेश चव्हाण याबाबत म्हणाले की, राज्यातील सर्वसामान्य नागरिकांचे अनेक प्रश्न सोडवण्याऐवजी, शासनाने आमदारांना घर देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात शेतकर्‍यांचे भरपूर प्रश्न कायम आहेत. ते सोडवण्यासाठी आघाडी सरकारला वेळ नाही. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना घरे देण्याची घोषणा म्हणजे निधीचा अपव्यय आहे.

राज्यातील शेतकरी व सर्वसामान्य वर्गाच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून, आमदारांना घरे देण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय चुकीचा असून, मी वैयक्तिक रित्या आमदार या नात्याने याचा विरोध करतो. मुंबईत घर नसल्याने एकही आमदार आजवर रस्त्यावर झोपलेला नाही. आमदारांना घरे देण्याऐवजी ग्रामीण भागातील हजारो रुग्ण मुंबईत उपचारासाठी येतात. त्यांच्या नातेवाईकांसाठी निवारा उपलब्ध करून द्यावा. त्यामुळे राज्यभरातून मुंबईतून उपचारासाठी येणार्‍या रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा मिळेल. तसेच त्यांची गैरसोय दूर होईल, अशी मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी केली आहे.

या माध्यमातून आमदार मंगेश चव्हाण यांनी राज्य सरकारचे घर नाकारत पेशंटच्या नातेवाईकांसाठी निवारा उभारण्याची मागणी केली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: