चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने गिरणा धरण पूर्ण भरण्याकडे वाटचाल करत असून यातून लवकरच नदीपात्रात पाणी सोडण्याची शक्यता आहे.
गिरणा नदीच्या जिल्ह्यात असलेल्या परिसरात अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नसला तरी या नदीवरील धरणाच्या वरील बाजूस गेल्या काही दिवसांपासून अतिशय जोरदार असा पाऊस झाला आहे. यामुळे दोन दिवसांपूर्वी या धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली होती. यात खबरदारीचा उपाय म्हणून दोन गेट उघडून पाण्याचा थोडा विसर्ग करण्यात आला होता.
दरम्यान, पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच असल्यामुळे रात्रीतून धरणाच्या जल पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. आज सकाळी सहा वाजता धरणात तब्बल ९१.४७ टक्के इतका जलसाठा झाला असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने जिल्हा माहिती कार्यालयाने दिली आहे. अर्थात, आता हे धरण पूर्ण भरण्याकडे वेगाने वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे. वरील बाजूस पावसाचा जोर कायम राहिला तर येत्या काही तासांमध्ये धरण पूर्ण भरू शकते. धरण पूर्ण भरल्यानंतर याचे दरवाजे उघडून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची शक्यता देखील यातून बळावली आहे.