कंत्राट मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बांधकामाचे कंत्राट मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणार्‍या दोघांच्या विरोधात येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, चाळीसगाव येथील प्रविण जयसिंग ठोके हे जळगाव येथील नितिन काबरे यांचे भागीदार आहेत. त्यांना पुण्यातील टेराफर्मा सुपरस्ट्रॅक्ट कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक प्रतीत शहा व त्याचा एजंट दीपक कुमार मंडल (प.बंगाल) यांनी, गोव्यातील विमानतळाच्या बांधकामाचे कंत्राट मिळवून देण्याचे आमीष दाखवले. हे कंत्राट टेराफर्मा कंपनीने ३५० कोटीत घेतले असून, त्या कंपनीला सब कॉन्ट्रॅक्टर कंपन्यांची गरज आहे, असे सांगत ठोके यांच्याकडून सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करण्यासाठी अनामत रक्कम म्हणून २० लाख रूपये घेतले. तसेच एजंट दीपक मंडल याला अडीच लाख रूपये दिले. यातील एक लाख रूपये त्याने नंतर परत केले.

दरम्यान, काही काळानंतर प्रतीत शहाच्या कंपनीला केवळ दीड कोटी रूपयाचे काम मिळाल्याचे समोर आले. यामुळे मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळवून देतो असे भासवून ठोेके यांच्याकडून २१ लाख रूपयांची फसवणूक करण्याचे उघडकीस आले. या प्रकरणी कंत्राटदार प्रवीण ठोके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content