वरखेडे-लोंढे प्रकल्पांतर्गत पुनर्वसनासाठी २६ कोटींची तरतूद ! : पालकमंत्री ना. पाटील यांचा पुढाकार

मुंबई प्रतिनिधी-चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे-लोंढे प्रकल्पाच्या अंतर्गत तामसवाडी गावठाणाच्या पुनर्वसनासाठी तब्बल २६ कोटी रूपयांच्या तरतुदीला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. आज मुंबईत उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे येथील प्रकल्पग्रस्तांना यामुळे दिलासा मिळाला आहे.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यात गिरणा नदीवर मध्यम स्वरूपाच्या वरखेडे-लोंढे प्रकल्पाच्या कामाला गती मिळालेली आहे. यामुळे ३५.३८ दलघमी इतक्या पाण्याचा साठा होणार आहे. यामुळे परिसरातील ३१ गावांना लाभ होणार आहे. दरम्यान, या तामसवाडी गाव प्रकल्पात जाणार नसल्याचे पाटबंधारे खात्याने सांगितले होते. मात्र प्रकल्प पूर्णत्वाकडे येत असतांना तामसवाडीच्या पुनर्वसानाचा प्रश्‍न मार्गी लावावा अशी मागणी तामसवाडी येथील ग्रामस्थांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे केली होती. याबाबत आधी अंशत: मान्यता मिळाली असून ना. गुलाबराव पाटील यांनी याला १००% मान्यता मिळवून देण्याची मागणी तेथील ग्रामस्थांनी केली होती.

दरम्यान, आज सकाळी मुंबईत महाराष्ट्र राज्य पुनर्वसन आणि पुनर्स्थापना सनियंत्रण समितीची बैठक या समितीचे पदसिध्द अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात निमंत्रीत सदस्य या नात्याने राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची देखील उपस्थिती होती. या बैठकीत वरखेडे-लोंढे प्रकल्पात तामसवाडी या गावाचे १०० टक्के पुनर्वसन होणार असून यासाठी २५ कोटी ८९ लाख रूपयांची तरतूद करावी अशी मागणी ना. गुलाबराव पाटील यांनी केली. यामुळे तामसवाडीकरांची प्रदीर्घ काळापासून प्रलंबीत असणारी मागणी पूर्ण झाली आहे. यासाठी ना. गुलाबराव पाटील यांनी केलेला पाठपुरावा निर्णायक ठरला आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!