भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील खंडाळा येथील रेशन दुकानातील तांदूळामध्ये सिमेंटचे खडे आढळून आल्याने रेशनधारकांनी संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी नायब तहसीलदार शशिकांत इंगळे यांनी दखल घेत रेशन दुकानातील सर्व माल पुन्हा गोदामात जमा करण्याच्या सुचना दिल्या आहे.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील खडका येथील रहिवाशी वसुंधरा सुरवाडे यांच्या नावे असलेले रेशन दुकान तालुक्यातील खंडाळा या गावात आहे. नेहमीप्रमाणे या महिन्याला रेशन माल घेण्यासाठी आलेल्या ग्राहकाल तांदूळ देण्यासाठी उघडलेल्या गोणीतून ५० ते १०० ग्रॅम वजनाचे सिंमेटचे खडे व माती मिश्रीत वाळू आढळून आले आहे. या प्रकारामुळे गावात खळबळ उडाली आहे. येथील काही ग्राहकांनी सदरील रेशनचा माल गावातील सरपंच नितीन पाटील यांना दाखवला. सरपंच नितीन पाटील यांनी नायब तहसीलदार इंगळे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानुसार भुसावळ येथील नायब तहसीलदार शशिकांत इंगळे यांनी रेशन दुकानात पाठविलेला गहू, तांदूळाच्या गोण्या परत मागाविला आहे. अशी माहिती सरपंच पाटील यांनी दिली आहे.