जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र वित्त व लेखा कोषागारे या विभागाची स्थापना 1962 मध्ये स्वतंत्रपणे करण्यात आली. तेव्हापासून 1 फेब्रुवारी हा दिवस लेखा व कोषागार दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
येथील जिल्हा कोषागार कार्यालयात लेखा व कोषागारे दिनानिमित्ताने लेखा व कोषागार संचालक बाळासाहेब घोरपडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री. घोरपडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, वित्त विभागा अधिनिस्त लेखा व कोषागार विभागाच्या अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांचे क्षेत्र खुप व्यापक आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याला सदैव्य तत्पर राहून काम करावे लागते. शासकीय निधीचा योग्य प्रकारे विनियोग, वाटप यावर योग्यप्रकारे नियंत्रण ठेवून विहित वेळेत त्याचे योग्य पध्दतीने वाटपाचे मुख्य कर्तव्य बजावताना विलंब किंवा चुकीला वावच नसतो.
याप्रसंगी जिल्हा कोषागार अधिकारी प्रविण पंडीत, स्थानिक निधीचे सहाय्यक संचालक भालचंद्र चव्हाण, जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी श्री. खैरनार, निवृत्त अपर कोषागार अधिकारी जी. टी. महाजन, अपर कोषागार अधिकारी सतीष महाजन, उप कोषागार अधिकारी महाजन, चौधरी, घन:शाम चौधरी, गोविंद पाटील आदि अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हा कोषागार अधिकारी प्रविण पंडीत यांचेसह सहाय्यक संचालक चव्हाण, लेखा अधिकारी खैरनार तसेच निवृत्त अपर कोषागार अधिकारी जी. टी. महाजन यांनी लेखा व कोषागार दिनानिमित्ताने उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना या दिनाचे महत्व, कर्तव्य आणि जबादाऱ्या या संदर्भात मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकात गोविंद पाटील यांनी लेखा व कोषागार दिनाचा उद्देश आणि त्याचे आपल्या दैनंदिन कामकाजातील महत्व याविषयी सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा कोषागार कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.