नवी दिल्ली-वृत्तसेवा | भारत आगामी काळात पाकसोबत फक्त पीओके आणि दहशतवादावरच चर्चा करेल असे स्पष्ट करतांनाच सध्याची शस्त्रसंधी ही तात्पुरती असून पुढे काही आगळीक घडल्यास कठोर निर्णय घेतला जाईल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. ते राष्ट्राला संबोधीत करत होते.
भारत सरकारने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी राष्ट्राला उद्देशून भाषण करताना पाकिस्तान आणि दहशतवादावर जोरदार हल्ला चढवला. “आपल्या बहिणींच्या कपाळावरील सिंदूर पुसणाऱ्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. हे केवळ लष्करी कारवाई नव्हे, तर भारतीय जनतेच्या भावनांचा स्फोट आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “दहशतवादी संघटनांनी आता हे समजून घेतले आहे की भारताच्या बहिणी-बेटींच्या कपाळावरील सिंदूर पुसण्याचा काय परिणाम होतो. ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक कारवाई नाही, ही न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे. भारताची स्पष्ट भूमिका आहे – ‘टेरर आणि टॉक’ एकत्र कधीच शक्य नाही. दहशतवादाचे समर्थन करणाऱ्यांबरोबर भारत कोणतीही चर्चा करणार नाही. पाकिस्तानशी चर्चा होणारच असेल, तर ती केवळ ‘पीओके’ अर्थात पाकव्याप्त काश्मीरबद्दलच होईल,” असे ठाम वक्तव्य पंतप्रधानांनी केलं.
पंतप्रधानांनी सांगितले की, ६ मेच्या रात्रीपासून ७ मेच्या सकाळपर्यंत चाललेल्या या ऑपरेशनमध्ये भारताने पाकव्याप्त क्षेत्रात दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. भारताचे मेड इन इंडिया ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि शस्त्रांनी पाकिस्तानच्या हवाई दलाचे अभिमानाचे ठिकाणे नेस्तनाबूत केली.
“भारताची प्रतिक्रिया आता केवळ शब्दांत नाही, ती कृतीतून आहे. दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर थेट कारवाई करून, आपण त्यांना त्यांच्या घरात जाऊन संपवले आहे. ऑपरेशन सिंदूरने एक नवे नॉर्मल ठरवले आहे – भारतावर हल्ला म्हणजे भारताची भीषण प्रतिक्रिया.”
पंतप्रधानांनी सांगितले की, “तीन दिवसांत भारताच्या कारवाईने पाकिस्तान एवढा हादरला की त्यांना आमच्या डीजीएमओंशी संपर्क साधावा लागला. पण भारताने केवळ कारवाई ‘स्थगित’ केली आहे, रद्द नाही. पाकिस्तानच्या पुढील वागणुकीवर आमची प्रतिक्रिया ठरेल.या कारवायांनी भारताची धोरण स्पष्ट केली आहे – न्यूक्लियर ब्लॅकमेल चालणार नाही, दहशतवाद्यांच्या पाठीशी उभे असलेल्यांवरही तितकीच कारवाई होईल, आणि भारत प्रत्येक हल्ल्याला आपल्या अटींवर उत्तर देईल.”
पंतप्रधान मोदी म्हणाले, “पाकिस्तानची सरकार आणि लष्कर ज्या पद्धतीने दहशतवादाला खतपाणी घालतात, त्यातूनच त्यांचा नाश होईल. जर त्यांनी स्वतःहून दहशतवाद नष्ट केला नाही, तर भविष्यात भारत आणखी कठोर पावले उचलण्यास मागे-पुढे पाहणार नाही.”
पंतप्रधान म्हणाले, “हे ऑपरेशन भारताच्या सैनिकांचे, नागरिकांचे आणि देशाच्या एकात्मतेचे प्रतिबिंब आहे. हे युग युद्धाचे नाही, पण हे युग दहशतवादाचेही नाही. म्हणूनच, भारताचे शून्य सहनशीलतेचे धोरणच जगासाठी नव्या आशेचा किरण आहे.” “भारताची शक्ती ही केवळ संरक्षणासाठीच नाही, तर मानवतेच्या रक्षणासाठी आहे.