सुशांत राजपूतच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे

नवी दिल्ली वृत्तसंस्था । अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू गुन्ह्यात सुप्रीम कोर्टाने आज तपास सीबीआय करणार असल्याचा निकाल दिला आहे. सुप्रीम कोर्टाने सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश मुंबई पोलिसांना दिला आहे.

पाटणामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करा, अशी मागणी एका याचिकेतून अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केली होती. त्यावर आज सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. पाटणा येथे दाखल झालेला एफआयआर योग्य असल्याचं व निर्णयाला आव्हान देण्याचा पर्याय महाराष्ट्राने नाकारला असल्याचंही सुप्रीम कोर्टाने यावेळी सांगितलं.

१४ जून रोजी मुंबईतील राहत्या घरी सुशांत मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूचा गुंता दिवसेंदिवस वाढत गेला. सुशांतने नेमकी आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

सुशांतच्या मृत्यूनंतर जवळपास दीड महिन्याने त्याचे वडील के. के. सिंह यांनी पाटणा पोलिसांकडे रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केली. त्यांनी रियावर अनेक गंभीर आरोप केले. त्यांच्या तक्रारीवरून पाटणा पोलिसांनी रियाविरोधात गुन्हा दाखल केला.

बिहारमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर बिहार पोलीस विरुद्ध मुंबई पोलीसच नव्हे तर दोन्ही राज्यातील सरकारमध्येही संघर्षमय वातावरण निर्माण झालं. सर्व पक्षांची बाजू ऐकून सुप्रीम कोर्टाने हा निकाल दिला आहे.

Protected Content