मध्यरात्री उघड्या घरातून रोकडसह दागिन्यांची चोरी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील मुस्लिम कॉलनीत राहणाऱ्या तरूणाचे उघड्या घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण १ लाख ९७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी २७ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता समोर आला आहे. याप्रकरणी सोमवारी २८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, शेख मोहम्मद दानिश शेख हुसेन वय ३२ रा. मुस्लिम कॉलनी, भुसावळ हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. हातमजूरी काम करून तो आपला उदरनिर्वाह करतो. २७ एप्रिल रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्याचे उघड्या घरात प्रवेश करून घरातून रोकड आणि सोन्याचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने असा एकुण १ लाख ९७ हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तरूणाने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव हे करीत आहे.

Protected Content