अपघातात तरूणाच्या मृत्यू प्रकरणी रिक्षाचालकावर गुन्हा दाखल


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल महाजन समोर रिक्षा पलटी झाल्याने ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी चौकशी अंती अखेर रविवारी २२ जून रोजी दुपारी ३ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसीम खान इस्माईल खान (वय-३२, रा. मुस्लिम कॉलनी, भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, वसीम खान इस्माईल खान हा तरूण आपल्या कुटुंबीयांसह भुसावळ शहरातील मुस्लिम कॉलनी परिसरात वास्तव्याला होता. ४ जून रोजी सकाळी १० वाजता तो रिक्षा क्रमांक (एमएच 19 बीजे 5491) ने भुसावळ येथून जळगावला जात असताना रस्त्यावरील नशिराबाद येथील राष्ट्रीय महामार्गावर चालक नईम खान सुभान खान याचा रिक्षावरील ताबा सुटल्याने रिक्षा पलटी झाली. या अपघातात वसीम खान याचा जागेवरच मृत्यू झाला होता. दरम्यान या घटनेची चौकशी केल्यानंतर अखेर रविवारी २२ जून रोजी दुपारी ३ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात चालक नईम खान सुभान खान (रा. मुस्लिम कॉलनी, भुसावळ) यांच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल योगेश वराडे करीत आहे.