लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरण्यासाठी पैसे घेणाऱ्या सेवा केंद्राचा परवाना रद्द करा: रिपब्लिकन पार्टीची मागणी

भुसावळ -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील डी. एस. हायस्कूल संकुलातील चव्हाण यांच्या आपले सरकार केंद्र डिजीटल सेवा कॉमन सर्व्हिस सेंटरमधून लाडकी बहिण योजनेत लाभार्थीकडून अर्ज भरण्यासाठी तब्बल 800 रुपये उकळले जात असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे केला आहे. यामुळे या केंद्राची चौकशी करून परवाना तत्काळ रद्द करावा, असेही निवेदनात नमूद आहे.

रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष विजय साळवे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपण स्वतः सोमवारी चव्हाण यांच्या आपले सरकार सेवा केंद्रात पत्नीच्या नावे अर्ज भरण्यासाठी गेलो. या ठिकाणी पहिल्याच टेबलवर बसलेल्या कर्मचाऱ्यास मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरण्यासाठी किती रुपये लागतील? याबाबत विचारणा केली. यावर त्याने 800 रुपये सांगितले. ही रक्कम ऐकून आपण चकित झालो. यामुळे या केंद्रात गोरगरिब व निरीक्षरांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचे दिसून आले. जातीचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, नॅशनॅलिटी, उत्पन्न, प्रतिज्ञापत्र, नॉन क्रिमिलेअर आदी दाखल्यांसाठी शासनाने मुल्य ठरवून दिले आहे. असे असतानाही अव्वाच्या सव्वा रक्कम घेतली जात आहे.

याबाबतच्या शुल्काचे फलक सेवा केंद्रामध्ये लावले गेले नाहीत. यामुळे नागरिकांना माहिती मिळत नाही. या काळात लाडकी बहिण योजनेसाठी लाभार्थीची फसवणूक होत आहे. यामुळे प्रचलित दरापेक्षा अधिक रक्कम घेणाऱ्या केंद्रांची चौकशी करून त्यांचे परवानगी रद्द करावी तसेच नागरिकांची होणारी आर्थिक लूट थांबवावी केली आहे.

Protected Content