जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने सन २०२६ साठी “मधुमित्र” व “मधुसखी” पुरस्कारासाठी नामांकने मागविण्यात आली आहेत. मधमाशीपालन व्यवसायाला चालना देणे तसेच या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मधपाळांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे.
या पुरस्कारांतर्गत मधमाशीपालन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मधपाळांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने गौरविण्यात येणार आहे. यामध्ये एक पुरस्कार महिला मधपाळासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. विजेत्यांना अनुक्रमे प्रथम क्रमांकासाठी ११ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ७ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

दरम्यान, जागतिक मधमाशा दिन या दिनाचे औचित्य साधून २० मे २०२६ रोजी पुणे येथे आयोजित जाहीर समारंभात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ www.mskvib.org वरून नामांकन अर्ज डाउनलोड करावा किंवा संबंधित जिल्हा खादी व ग्रामोद्योग कार्यालयातून अर्ज घ्यावा. पूर्ण भरलेले अर्ज ४ मे २०२६ पूर्वी जिल्हा कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, जळगाव (दूरध्वनी: ०२५७-२२५४४२८ / ९१६६५३८१०२८) तसेच मध संचालनालय, महाबळेश्वर (दूरध्वनी: ०२१६८-२६०२६४) यांच्याशी संपर्क साधावा.



