धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील हिंगोणे बु या खेडेगावातून जीवन प्रवास सुरु करुन ज्यांनी व्यवसाय उद्योगात उत्तुंग झेप घेतली, असे पुखराजजी पगारीया यांनी नुकतीच विज्ञानगाव कल्याणेहोळला भेट दिली. यावेळी आपल्या मातीबद्दल भाऊंचे अनोखे ऋणानुबंध त्यांच्या प्रत्येक शब्दात जाणवत होते.
पुखराज पगारिया यांनी गावात आल्याआल्या आपल्या वर्गमित्रांची नावे सांगितली. गावातील अबाल वृद्धांशी अनौपचारिक गप्पा करताना त्यांनी अनेक सल्ले दिलेत. गावात उद्योग उभारले पाहिजेत. गावातून उद्योग करणारे लोक बाहेर पडलेत म्हणून खेडी उजाड झाली आहेत. त्यामुळे गावातील चलन गावात फिरायला पाहिजे, जेणेकरून गावची अर्थव्यवस्था सुदृढ राहते. तरुणांनी राजकारणापासून अलिप्त राहायला पाहिजे, राजकारणी लोकांनी तरुण पिढीचा नाश केला. शिक्षण आणि पाणी या दोन गोष्टींची गावातील लोकांनी काळजी घ्यावी. कारण एकावर पिढ्या पिकणार आहेत तर दुसरीवर शेती. या प्रसंगी लोकनियुक्त सरपंच रमेश पाटील व मान्यवरांनी श्री.पगारिया यांना विद्येची देवता सरस्वती देवीची मूर्ती भेट दिली. त्यानंतर पगारीयाजी यांनी विज्ञानगाव प्रकल्प राज्यात आदर्श उदाहरण असल्याचे सांगत तरुणांचे कौतुक करावे तितके थोडे असल्याचे म्हटले. यावेळी माजी सरपंच नारायण पाटील, मुकत्यारसिंग पाटील, पोलीस पाटील भिका पाटील, शिक्षक समाधान पाटील, भगवान पाटील,पवन पाटील,कोमलसिंग पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.