एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न फसला !

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील फेकरी या गावात काल रात्री तब्बल सहा घरांमध्ये चोरट्यांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न बाजूच्या ग्रामस्थांच्या सतर्कतेने हाणून पाडण्यात आला आहे.

भुसावळ तालुक्यातील फेकरी गावात काल अर्थात २९ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सहाठिकाणी घरफोडीच्या प्रयत्नांच्या घटना घडल्या आहेत. चोरी झाल्याचे कळताच नगरीकांनी घटनेची खबर पोलीस पाटील किशोर बोरोले यांना दिली. प्रसंगी घटनास्थळी पो.नि.बबन जगताप, सहा.पोनि.अमोल पवार यांच्यासह असिस्टंट श्यामकुमार मोरे, पो.हवलदार प्रेमचंद सपकाळे,योगेश पालवे यांनी घटनेचा पंचनामा केला.

या सहाही घरांमधून कोणत्याच प्रकारचा मुद्देमाल गेला नसल्याचे पोलिस कॉन्स्टेबल प्रेमचंद सपकाळे यांनी आमच्या प्रतिनिधीजवळ सांगितले. घटनास्थळी जळगाव येथील श्वानपथक हजर झाले असता श्वानपथकाने चोरट्यांचा जाण्याचा मार्ग नॅशनल हायवे क्र.६, फेकरी बंद टोलनाक्याकडे दाखवला. घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.

फेकरी गावातील संतोष कवटे, यशवंत बर्‍़हाटे, सुरज मोरया, विनोद बोरोले व संस्कृतीनगर येथील सुभाष तायडे, व प्रकाश मोरे यांच्या घराचे कुलूप व कडी-कोंडा तोडत कपाटातील  व घरातील सामान अस्ताव्यस्त केला. चोरी करतांना चोरट्यांनी शेजारील रहिवाशांच्या घराचे दार बाहेरुन कडी लावून बंद केले होते. पण शेजारचे नागरिक जागी झाल्याचे समजताच चोर पसार झाले. चोरट्यांनी सदर चोरी प्लॅनिंग करून केली असावी कारण त्यांनी फक्त बंद घरांचे कुलूप तोडले आहेत. पाच ते सहाच्या संख्येत चोरटे चारचाकी वाहनाने गावात शिरले व त्यांच्याकडे टॉर्च, छिन्नी,हातोडा व कुलुप तोडणयाचे इतर साहित्य असल्याचे एका नागरिकाने सांगितले.

एकाच दिवशी लागोपाठ चोरीच्या घटनेने फेकरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गावात रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे. गावात आजूबाजूला बेवारस वस्तू अथवा व्यक्ती आढळून आल्यास संबंधित गावातील पोलीस पाटील, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांना कळवावे; असे सरपंच चेतना भीरुड, सामाजिक कार्यकर्ते संजय भिरूड व प्रशांत निकम यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बबन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

Protected Content