
अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यासाठी २७ ऑगस्टचा दिवस काळा ठरला. अवघ्या काही तासांच्या अंतरात घडलेल्या दोन हृदयद्रावक घटनांमध्ये सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण तालुका सुन्न झाला आहे. टाकरखेडा येथे पती-पत्नीने आपल्या दोन मुलांसह रेल्वेखाली जीवन संपवल्याची घटना घडली, तर खौशी येथे तलावात बुडणाऱ्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांसह मुलाचाही बुडून मृत्यू झाला. या घटनांमुळे दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टाकरखेडा येथे सुनील अमृत भिल आणि त्यांच्या पत्नी पार्वती सुनील भिल यांनी आपल्या दोन मुलांसह पहाटेच्या सुमारास घराबाहेर पडत रेल्वेखाली जीवन संपवले. या घटनेत त्यांच्यासोबत असलेले सनी आणि राज या दोन चिमुकल्यांचाही मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील चार जणांचा अशाप्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने टाकरखेडा गावात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, या सामूहिक मृत्यूमागील कारणांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.
दरम्यान, अमळनेर तालुक्यातील खौशी येथेही काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. तलावात मुलगा बुडत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी वडील पाण्यात उतरले. मात्र, मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांवरही काळाने घाला घातला.
प्राथमिक माहितीनुसार, तलावातील गाळात मुलगा फसल्याचे वडिलांच्या निदर्शनास आले. मुलाचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी तातडीने पाण्यात प्रवेश केला. मात्र, मुलाला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात ते स्वतःही गाळात फसले. यात बाप-लेकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नांनंतर दोघांना पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात आणण्यात आले. या घटनेने खौशी गावावरही दुःखाचा डोंगर कोसळला असून, बाप-लेकाच्या मृत्यूने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
याचदरम्यान बुधवारी सायंकाळी एका व्यक्तीने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याचीही घटना समोर आली असून, या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसल्याचे समजते. त्यामुळे अमळनेर तालुक्यातील या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता आणि हळहळ व्यक्त होत आहे. एकाच कालावधीत घडलेल्या या घटनांनी अमळनेर तालुक्यातील अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. टाकरखेडा येथील घटनेचे कारण शोधण्यासाठी तसेच खौशी येथील बाप-लेकाच्या बुडण्याच्या घटनेची आवश्यक ती चौकशी करण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.



