चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील आडगाव येथे एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी करून एकुण ६ लाख ६१ हजार ८०० रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रकमेचा ऐवज चोरून नेल्याची धक्कादायक घटना रविवारी १९ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील आडगाव येथे रमेश नफ्फर पाटील, भगवान निंबा पाटील आणि तुषार नामदेव शेळके यांचे घर बंद असतांना १८ मे रोजी रात्री १० ते १९ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी तिनही बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकुण ६ लाख ६१ हजार ८०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना घडकीला आल्यानंतर रमेश पाटील, भगवान पाटील आणि तुषार शेळके यांनी मेहुणबारे पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार रविवारी १९ मे रोजी दुपारी अडीच वाजता मेहुणबारे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे हे करीत आहे.