चाळीसगावात दाम्पत्याचा करून अंत; परिसर हादरला !

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लग्नानंतर दोन्ही मुलीच झाल्या याचा राग डोक्यात ठेवून पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड मारून तिचा खून केला. त्यानंतर स्वत: रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची मन सुन्न करणारी घटना बुधवारी सकाळी चाळीसगाव शहरात घडली. दरम्यान, पत्नी दुसऱ्या बाळंपणासाठी माहेरी गेली होती. दुसरीही मुलगी झाली. त्यानंतर घरी परतल्यावर तिच्या सोबत हा थरारक प्रसंग घडला. यात तिचा जीव गेला. आईवडीलांच्या मृत्यूने दोन्ही चिमुकल्या मुलींचे मातृ व पितृ छत्र हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्‍त केली जात आहे. सुरज दिलीप कुऱ्हाडे (वय-२८) असे पती तर रेश्मा सुरज कुऱ्हाडे असे मयत पत्नीचे नाव आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, धुळे जिल्ह्यातील जुनोने येथील रेश्मा यांच्याशी तीन वर्षांपुर्वी सुरज याचा विवाह झाला होता. तो पत्नी व मुलाबाळांसह चाळीसगाव शहरातील करगाव रोडवरील जय गणेश नगर वास्तव्याला होता. मातीकाम करून आपला उदरनिर्वाह करत होता. लग्नानंतर सुरजला पहिली मुलगी झाली. त्याला मुलाची इच्छा होती. तसेच त्याला दारूचे व्यसन होते. या दोन्ही कारणावरून त्याचे पत्नी रेश्मा हिच्यासोबत नेहमीच भांडण होत असे. गेल्या चार महिन्यांपुर्वीच रेश्मा दुसऱ्या बाळंपणासाठी माहेरी जुनोने येथे गेल्या. तिला दुसरीही मुलगीच झाली. दोन दिवसांच्या मुक्कामानंतर सुरज रेश्माला घेवून चाळीसगावला परतला.

दरम्यान, चाळीसगावात घरी परतल्यावर दोन दिवस उलटले. आज बुधवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास दोन मुलीच झाल्या यावरून त्याचा पत्नी रेश्मासोबत वाद झाला. या वादात त्याने रेश्माच्या डोक्यात घाव घालून खून केला. घटनेनंतर सुरज घरातून निघून गेला. घराजवळ गर्दी जमली असतांनाच काही वेळातच सुरजने तो राहत असलेल्या परिसरातीलच धुळे रेल्वे लाईनवर रेल्वखाली झोकून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. रेश्माच्या नातेवाईकांनी घटनास्थळ गाठून खात्री केली असता मयत हा सुरज हाच असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी मयत रेश्मा हिचे नातेवाईक प्रताप शांताराम गायकवाड रा. जुनोने ता.जि.धुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पत्नीचा खुन व पतीची आत्महत्या या घटनेने चाळीगाव शहर हादरले आहे. तर दुसरीकडे दोन चिमुकल्यांचे मातृ व पितृ छत्र हरपल्याने सर्वत्र या घटनेचा हळहळ व्यक्त केले जात आहे. पुढील तपास सहाय्यक पोली निरीक्षक दिपक बिरारी करीत आहे.

Protected Content