बारागाड्यांचे चाक पोटावरून गेल्याने तरूणाचा दुदैवी मृत्यू !

एरंडोल/जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील तळई गावात बारागाड्या ओढण्याच्या कार्यक्रमात गाडीचे चाक पोटावरून गेल्याने गंभीर जखमी झालेल्या तरूणाचा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रात्री अडीच वाजता मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बुधवारी ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चंपाषष्ठीनिमित्त जळगाव जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याचपद्धतीने एरंडोल तालुक्यातील तळई येथे मंगळवारी २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता चंपाषष्ठीनिमित्त बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या बारागाड्या ओढण्याच्या कार्यक्रमात तळई गावातील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असतो. या गर्दीत तळई येथील राहूल पंडीत पाटील (वय-३०) रा. तळई ता. एरंडोल हा तरूण देखील होता. दरम्यान, बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रमात राहूल पाटील हा गर्दीत धक्कालागल्याने बारागाड्यांच्या समोर आला. या दुदैवी घटनेत त्यांच्या पोटावरून चाक केल्याचे गंभीररित्या जखमी झाला. त्याला तातडीने जळगाव येथील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दरम्यान मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, राहूल पाटील हा एरंडोल तालुक्यातील निपाणे येथील जिल्हा बँकेच्या शाखेत नोकरीला होता. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोलीस नाईक ललित भदाणे करीत आहे.

Protected Content