कुसुंबा येथे भरधाव डंपरच्या धडकेत तरुण ठार

kusumba

जळगाव प्रतिनिधी | कामावरून रिक्षाने घरी जात असताना रिक्षाजवळ उभे असलेल्या तरुणाला मागून येणाऱ्या भरधाव डंपरने जोरदार धडक दिली. या धडकेत तरुणाचा जागीच मुत्यु झाला असून ही घटना आज (दि.16) सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास कुसुंबा येथे घडली आहे. या घटनेनंतर डंपर चालक फरार झाला असून डंपर एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, ईश्वर रतन मिस्तरी (वय-35) रा. कुसुंबा हे गवंडीचे काम करतात तसेच काही वेळा चटईच्या फॅक्टरीत काम करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आज सकाळी चटई कंपनीतून काम करून रिक्षाने कुसुंबा गावातील देवा सायकल मार्ट समोर उतरले. त्याचवेळी मागून येणाऱ्या वाळूने भरलेले डंपर क्रमांक (एमएच 19 झेड 7557)ने जोरदार धडक दिली. या धडकेत ईश्वर मिस्तरी यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर डंपर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मयताचा पंचनामा करून डंपर ताब्यात घेतले.

जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची एकच गर्दी जमली होती. मयताची पत्नी शीतल या मुलांसोबत जामनेर येथे माहेरी गेल्या होत्या. त्यांच्या पश्चात पत्नी शीतल, दोन मुले करण आणि हितेश व मुलगी निशा तर लहान भाऊ संदीप असा परिवार आहे. एमआयडीसी पोलिसात अज्ञात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content