मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. पेपर सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना अर्धा तास अगोदर केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. पेपर सुरू झाल्यानंतर आलेल्या विद्यार्थ्याला परीक्षेला बसू दिले जाणार नाही, अशा बोर्डाकडून प्रत्येक केंद्रांना सूचना देण्यात आल्या आहेत.
बोर्डाने कॉपीमुक्त परीक्षेसाठी यंदा सरमिसळ पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकाच शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी परीक्षेवेळी एकामागे एक नसणार आहेत. वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर त्यांचे क्रमांक असतील. विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्याच्या दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका दिली जायची. पण, आता ही पद्धत बंद करून पेपरच्या शेवटी दहा मिनिटांचा वाढीव दिला जाणार आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर, संगणक क्लास पेपर होईपर्यंत बंद राहतील, असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे. भाषा विषयाशिवाय इतर विषयांच्या पेपरसाठी बोर्डाने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळेल असे वेळापत्रक तयार केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेबद्दल कोणतीही भीती न बाळगता आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी, असे आवाहनही बोर्डाने केले आहे.
ठळक बाबी…
इयत्ता बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्चपर्यंत सुरू राहील
इयत्ता दहावीची परीक्षा १ ते २३ मार्चपर्यंतच चालणार आहे
इयत्ता बारावीची परीक्षा पुढच्या आठवड्यात सुरू होणार असून उत्तरपत्रिका परीक्षा केंद्रांवर पोच झाल्या आहेत. प्रश्नपत्रिका परीक्षेच्या आदल्या दिवशी पोच होतील. पण, गतवर्षी एकाच गाडीत दोन-तीन तालुक्यांच्या प्रश्नपत्रिका नेल्या जात होत्या आणि त्यामुळे रात्री खूप उशीर व्हायचा. यंदा मात्र बोर्डाने सोलापूर जिल्ह्यातील १४ कस्टडीसाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था केल्याने परीक्षेच्या आदल्या दिवशी रात्री सात ते आठपर्यंत प्रश्नपत्रिका प्रत्येक केंद्रावर पोच होतील. दरम्यान, शिक्षण विस्ताराधिकाऱ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकण्यासंदर्भात निवेदन दिले असून त्यांच्या मागण्यांवर बोर्डाने गुरुवारी (ता. १५) बैठक बोलावली आहे.
परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात असलेली झेरॉक्स केंद्र, फॅक्स, एसटीडी, आयएसडी बुथ, ई-मेल, इंटरनेट, मोबाइल, लॅपटॉप, प्रसार माध्यमे अथवा इतर संपर्क साधनांचा वापर करण्यास बंदी असणार आहे. परीक्षा केंद्रालगतच्या २०० मीटर परिसरात अशी साधने वापरण्यावर निर्बंध असणार आहेत. पण, विद्यार्थ्यांना सोडण्यास आलेल्या पालकांसह परीक्षा केंद्राची व्यवस्था पाहणारे परीक्षक, सुपरवायझर, शिपाई व शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या व्यक्तींना हा आदेश लागू नसेल. परीक्षा कालावधीत केंद्राच्या १०० मीटर परिसरात पाच किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येण्यासही बंदी असेल, असे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने काढले आहेत.