
मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोरगरीब जनतेच्या सरकारी कामांसाठीच नेमलेल्या मुक्ताईनगर येथील तहसील कार्यालयातच गरजू नागरिकांची आर्थिक लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. श्रावण बाळ योजना, संजय गांधी योजना आणि शालेय प्रवेशासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या कागदपत्रांच्या शपथपत्रांवर सही-शिक्क्यासाठी तहसील कार्यालयातील अव्वल कारकून कैलास पाटील हे थेट एका लाभार्थी महिलेकडून रोख रक्कम स्वीकारताना व्हिडिओमध्ये रंगेहाथ कैद झाले आहेत. गोरगरिबांकडून पैसे उकळण्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमांवर व्हायरल झाला असून, जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मागील काही दिवसांपासून तहसील कार्यालयात शासकीय कामांसाठी, विशेषतः ‘शपथपत्र’ तयार करण्यासाठी आणि त्यावर शिक्का-सही मिळवण्यासाठी नागरिकांकडून अनधिकृतपणे पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी होत्या. मात्र, अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने भ्रष्टाचार बोकाळला होता. अखेर एका जागरूक नागरिकाने या गैरप्रकाराचा पर्दाफाश करण्याचा निर्णय घेतला. त्याने आवश्यक कागदपत्रांसाठी कारकून कैलास पाटील यांना पैसे देतानाचा संपूर्ण व्यवहार आपल्या कॅमेऱ्यात चित्रीत केला.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कारकून कैलास पाटील हे श्रावण बाळ योजना, संजय गांधी योजना आणि विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांसाठी आवश्यक असलेल्या शपथपत्रावर सही-शिक्का देण्यासाठी नागरिकांकडून रोख रक्कम स्वीकारताना स्पष्टपणे दिसत आहेत. गोरगरिबांच्या योजनांसाठीही पैशाची मागणी करणाऱ्या या भ्रष्ट कारभारावर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
तहसीलदारांकडून चौकशीचे आश्वासन:
या गंभीर प्रकाराबद्दल मुक्ताईनगरचे तहसीलदार शिरीष वखारे यांना विचारणा केली असता, त्यांनी तातडीने याची दखल घेतली. “संबंधित प्रकाराची गांभीर्याने चौकशी करण्यात येईल आणि दोषी आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे आश्वासन तहसीलदार शिरीष वखारे यांनी दिले आहे.गोरगरिबांच्या योजनांसाठी पैसे घेणाऱ्या या भ्रष्ट कारकुनावर तातडीने निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.



