Home Cities जळगाव डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन

0
142


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारताचे माजी राष्ट्रपती, महान वैज्ञानिक आणि युवांच्या प्रेरणास्थान असलेले डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन दरवर्षी ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयातील ग्रंथालयात विशेष ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींनी या प्रदर्शनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वाचन संस्कृती जिवंत ठेवण्याचा संदेश दिला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. कविता देशमुख यांनी डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पगुच्छ अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. त्यांनी आपल्या मनोगतातून कलाम यांच्या प्रेरणादायी जीवनाचा आढावा घेत विद्यार्थिनींना वाचनाची सवय लावण्याचे आवाहन केले. “डॉ. कलाम यांचे जीवन म्हणजे ज्ञान, जिद्द आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. त्यांच्याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थिनीने स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी वाचनाचा आधार घ्यावा,” असे त्या म्हणाल्या.

या प्रसंगी कोमल कोळी या विद्यार्थिनीने अब्दुल कलाम यांच्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले. तिने “वाचनामुळे व्यक्तिमत्व विकास होतो आणि समाजात परिवर्तन घडवण्याची प्रेरणा मिळते,” असे सांगत उपस्थितांना प्रेरित केले.

ग्रंथालयात विविध विषयांवरील शैक्षणिक, प्रेरणादायी आणि विज्ञानविषयक पुस्तकांचे आकर्षक प्रदर्शन मांडण्यात आले होते. विद्यार्थिनींनी आपल्या आवडीची पुस्तके वाचून ज्ञानवृद्धीचा आनंद लुटला. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली असल्याचे प्राचार्या देशमुख यांनी समाधान व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रंथपाल प्रा. कविता भोरटके, प्रशासकीय अधिकारी मीनल राणे, एनएसएस अधिकारी प्रा. जयश्री कुलकर्णी आणि प्रा. स्वाती जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.

 


Protected Content

Play sound