Home Cities जळगाव कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनकार्यावर जळगावात विशेष उपक्रम : शिवतीर्थ मैदानावरून भव्य...

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनकार्यावर जळगावात विशेष उपक्रम : शिवतीर्थ मैदानावरून भव्य बाईक रॅली उत्साहात संपन्न

0
9

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रयत शिक्षण संस्था, सातारा आणि नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनकार्यावर आधारित विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांची माहिती जळगाव शहरवासीयांपर्यंत पोहोचावी आणि जनजागृती व्हावी यासाठी मंगळवार, १३ ऑक्टोबर रोजी शहरातून भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला नागरिकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

मंगळवारी सकाळी ९:०० वाजता शिवतीर्थ मैदानावरून या भव्य बाईक रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. ही रॅली शिवतीर्थ मैदानापासून निघून नेहरू चौक, शास्त्री टॉवर, चित्रा चौक, पुष्पलता बेंडाळे चौक, पांडे चौक, स्वातंत्र्य चौक, नवीन बस स्टँड आणि कोर्ट चौक या प्रमुख मार्गांवरून जात नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणात समाप्त झाली. रॅलीच्या संपूर्ण मार्गावर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा आणि कार्याचा जयघोष करण्यात आला.

या जनजागृती रॅलीमध्ये १०० दुचाकी आणि कर्मवीर अण्णांच्या जीवनकार्याची माहिती देणारा १ विशेष चित्ररथ (ट्रॅक्टर) सहभागी झाला होता. सुमारे १५० नागरिक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि उत्साहाने या रॅलीत सहभाग नोंदवला. या रॅलीच्या माध्यमातून आगामी कार्यक्रमांबाबत संपूर्ण जळगाव शहरात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या उपक्रमांचा पुढील टप्पा म्हणून १५ आणि १६ ऑक्टोबर २०२६ रोजी नूतन मराठा महाविद्यालयात महारंगोळी, डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनचरित्रावर आधारित विशेष प्रदर्शन तसेच ध्वनीफितींचे सादरीकरण होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना जळगावकर नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound