अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे एकाच रात्री पाच बंद घर फोडून सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि ईलेक्ट्रीक मोटारी असा एकुण सुमारे ३ लाख ६७ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आले. याप्रकरणी दुपारी २ वाजता मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील मांडळ गावात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. यात पाच जणांच्या घरात चोरी झाल्याचे शनिवारी ६ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास उघडकीला आले यात नितीन मोतीलाल पाटील यांच्या घरातून ६० हजार ५०० रूपयांचे दागिने आणि २ लाख २० हजारांची रोकड, टिनाबाई हेमंत ठाकूर यांच्या घरातून १० हजार रूपये, महेश नामदेव ठाकूर यांच्या घरातून ५० हजार रूपये, नरेश मधुकर कुळकर्णी यांच्या घरातून २५ हजार रूपये आणि गुलाब निळकंठ पाटील याच्या घरातून २ हजार रूपये किंमतीची पाण्याची मोटार असा एकुण सुमारे ३ लाख ६७ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अखेर नितीन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुपारी २ वाजता मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि शितलकुमार नाईक हे करीत आहे.