ब्रेकींग न्यूज : अंत्ययात्रेत मधमाशांचा हल्ला; तिघे गंभीर जखमी

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील नगाव येथे एक अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे जात असताना मधमाशांनी हल्ला केल्याने एक विचित्र आणि धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले असून, अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांमध्ये एकच गोंधळ उडाला.

नगाव गावातून अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे जात असताना रस्त्यात अचानक मधमाशांचे पोळ उठले आणि त्यांनी हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे अंत्ययात्रेत सहभागी झालेले नागरिक भयभीत झाले आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. काही क्षण अंत्ययात्रेतील शोकाकुल वातावरण पूर्णपणे बदलून गेले.

या हल्ल्यात साधु भागा भिल (वय-७५), ओंकार शंकर भिल (वय-६५) आणि मधुकर सजन भिल (वय-५५, सर्व रा. नगाव) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांनी एकच गर्दी केली आहे.

Protected Content