ब्रेकींग : महिला सरपंच, पती, मुलासह एकाला ४० हजारांची लाच घेतांना रंगेहात पकडले !

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील मेहु गावातील विद्यमान महिला सरपंच, तिचा पती, मुलगा आणि सेतू सुविधा केंद्र चालक अशा चारही जणांना ४० हजार रुपयांची लाच घेताना पकडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. ही कारवाई जळगावच्या एसीबी पथकाने केली असून याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, मेहु गावात सात लाख रुपये किमतीची व्यायामशाळा बांधण्यासाठी धनश्री कंट्रक्शन या कंपनीला करार देण्यात आला होता. या प्रकल्पासाठी २०२३ मध्ये लोकनियुक्त सरपंच म्हणून जिजाबाई गणेश पाटील यांची निवड झाली होती. त्यानंतर धनश्री कंट्रक्शनच्या प्रतिनिधीने सरपंचांकडे मंजूर निधीची मागणी केली. यावेळी सरपंचांनी सात लाख रुपयांपैकी चार लाख रुपयांचा धनादेश कंपनीला दिला होता. उर्वरित तीन लाख रुपयांचा निधी देण्यासाठी सरपंचांनी ७० हजार रुपयांची लाच मागितली होती.

सरपंच जिजाबाई गणेश पाटील यांच्या पती गणेश सुपडू पाटील यांनी या रकमेची तडजोड करून ती ४० हजार रुपयांवर आणली. त्यानंतर सरपंचांच्या मुलगा शुभम गणेश पाटील आणि सेतू सुविधा केंद्र चालक समाधान देवसिंग पाटील याला लाच स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन दिले. समाधान पाटील यांनी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना जळगावच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

अँटी करप्शन ब्युरोची कारवाई
या प्रकरणात अँटी करप्शन ब्युरोच्या पोकॉ राकेश दुसाने आणि पोकॉ अमोल सुर्यवंशी यांनी सापळा रचला. त्यांनी सरपंच जिजाबाई गणेश पाटील, तिचा पती गणेश सुपडू पाटील, मुलगा शुभम गणेश पाटील आणि सेतू सुविधा केंद्र चालक समाधान देवसिंग पाटील यांना लाच घेताना पकडले. या संबंधितांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे पारोळा तालुक्यात खळबळ उडाली आहे. स्थानिक लोक आणि समाजकार्यकर्त्यांनी या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सरपंच आणि तिच्या कुटुंबीयांनी ग्रामीण विकासाच्या प्रकल्पांचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content