जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर मनराज मोटर्स जवळ २५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली. सिमेंट ट्रक चालक मोहंमद मुसा शेख (वय ५९, रा. तांबापुरा) यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ एप्रिल रोजी रात्री शेख यांनी सिमेंट ट्रक एमआयडीसी परिसरात उभा केला होता. कामावरून सुटल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला घरी येण्यासाठी फोन करून बोलावून घेतले आणि ते पायी घराकडे निघाले. दरम्यान, रस्त्यावरून जात असताना त्यांना एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. याच वेळी, वडिलांना घेण्यासाठी त्यांचा मुलगा दुचाकीने निघाला होता. मार्गात त्याला रस्त्यावर मोठी गर्दी दिसली. काय घडले हे पाहण्यासाठी तो तिथे थांबला असता, त्याला आपल्या वडिलांचाच भीषण अपघात झाल्याचे पाहून धक्का बसला.

उपस्थितांच्या मदतीने त्यांना तातडीने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना २८ एप्रिल रोजी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे शेख कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. अज्ञात वाहनाचा शोध घेणे आता पोलिसांसमोर आव्हान ठरणार आहे.



