

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना नागरिकांचे हरवलेले आणि गहाळ झालेले मोबाईल फोन शोधण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी ‘सीईआयआर’ (CEIR – Central Equipment Identity Register) पोर्टल आणि तांत्रिक विश्लेषणाचा (Technical Analysis) प्रभावी वापर करण्याच्या सूचना होत्या.
पोलीस टीमने CEIR पोर्टल आणि तांत्रिक माहितीचे विश्लेषण केले. या आधारे, गहाळ झालेल्या एकूण १८ मोबाईल फोनचा शोध घेण्यात आला आणि ते मोबाईल हस्तगत करण्यात आले. मोबाईल मिळाल्यानंतर, पोलिसांनी तत्काळ संबंधित मूळ मालकांशी संपर्क साधला आणि त्यांचे मोबाईल त्यांना सन्मानपूर्वक परत केले. आपले हरवलेले मोबाईल पुन्हा मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले असून समाधान व्यक्त केले आहे.
या विशेष मोहिमेमध्ये CEIR पोर्टलचे कामकाज पाहणारे पोलीस हेड कॉन्स्टेबल मोतीलाल विठ्ठल बोरसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद लाडवंजारी आणि महिला पोलीस अंमलदार रामकला राठोड यांनी तांत्रिक माहितीचे अत्यंत अचूक विश्लेषण केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच मोबाईल शोधण्यात मोठे यश मिळाले.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील या टीममध्ये पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग पाटील, पोहेकॉ. मोतीलाल बोरसे, पोहेकॉ. प्रमोद लाडवंजारी आणि मपोअं. रामकला राठोड यांचा समावेश होता. या सर्वांनी केलेल्या उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.



