मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने जाहीर केलेल्या 2024 च्या भ्रष्टाचार निर्देशांकानुसार डेन्मार्कने सलग दुसऱ्या वर्षी जगातील सर्वात कमी भ्रष्ट देश म्हणून आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. डेन्मार्कला 100 पैकी 90 गुण मिळाले असून फिनलंड (88 गुण), सिंगापूर (84 गुण), न्यूझीलंड (83 गुण) आणि लक्झेंबर्ग (81 गुण) यांनी अनुक्रमे दुसरे, तिसरे, चौथे आणि पाचवे स्थान पटकावले आहे.
दरम्यान, भारतासाठी ही वेळ चिंतेची ठरली आहे. 2023 मध्ये 93 व्या स्थानावर असलेला भारत, 2024 मध्ये 38 गुणांसह 96 व्या स्थानावर घसरला आहे. गेल्या वर्षी भारताला 39 गुण मिळाले होते, तर 2022 मध्ये हे गुण 40 होते. या घसरणीमुळे भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचार वाढल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
भारतातील भ्रष्टाचाराची 10 वर्षांची प्रवासगाथा:2014 मध्ये भारत 85 व्या स्थानावर होता. 2015 मध्ये सर्वोत्तम कामगिरी करत भारताने 76 वे स्थान मिळवले होते. मात्र त्यानंतर भारताच्या क्रमवारीत सातत्याने घसरण झाली आहे. गेल्या 10 वर्षांत भारत 11 स्थानांनी घसरला आहे, जे देशातील भ्रष्टाचाराच्या वाढत्या समस्येकडे लक्ष वेधते.
दक्षिण सुदानला सर्वाधिक भ्रष्ट देश म्हणून ओळखले गेले असून केवळ 8 गुण मिळाले आहेत. त्यानंतर सोमालिया (9 गुण), व्हेनेझुएला (10 गुण), सीरिया (12 गुण), लिबिया (13 गुण), इरिट्रिया (13 गुण), येमेन (13 गुण) आणि इक्वेटोरियल गिनी (13 गुण) यांचा क्रमांक लागतो.
भ्रष्टाचार निर्देशांकाची मोजमाप पद्धत:ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलचा भ्रष्टाचार निर्देशांक 180 देशांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे मूल्यांकन करतो. हे मूल्यांकन संबंधित क्षेत्रातील तज्ञ आणि व्यावसायिकांच्या मतांच्या आधारे केले जाते.