दुकानावर बसलेल्या एकाचा मोबाईल दोघांनी धुमस्टाईल लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नेरीनाका जवळील सलून दुकानाच्या बाहेर मोबाईल पाहत बसलेल्या एका प्रौढाच्या हातातून अज्ञात दोन जणांनी मोबाईल हिसकावून पसार झाल्याची घटना २ जुलै रोजी रात्री ९ वाजता घडली होती. याप्रकरणी चौकशी अंती अखेर मंगळवारी ९ जुलै रोजी दुपारी ४ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, राजीव पुरुषोत्तम नारखेडे वय-५७, रा.भवानी पेठ, जळगाव हे प्रौढ व्यक्ती २ जुलै रोजी रात्री ९ वाजता जळगाव शहरातील नेरी नाका येथील सलून दुकानासमोर बसलेले होते. त्यावेळी हातात मोबाईल धरून फोन पाहत असताना अज्ञात दोन जण दुचाकीवर आले. यातील एकाने त्यांच्या हाताला झटका मारून २५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरी हिसकावून दुचाकीवर घेऊन अजिंठा चौफुलीकडे पसार झाला. ही घटना घडल्यानंतर त्यांनी शोधाशोध केली. परंतु या संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर मंगळवारी ९ जुलै रोजी दुपारी ४ वाजता राजीव नारखेडे यांनी शनिपेठ पोलिसात धाव घेतली व तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय खैरे करीत आहे.

Protected Content