चंद्रकांत भंडारी यांच्या ‘शोध : शिक्षणासह माणसांचा’ पुस्तकाचे प्रकाशन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ख्यातनाम लेखक, स्तंभलेखक तथा शिक्षणतज्ज्ञ तसेच केसीईचे शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी यांच्या ‘शोध : माणसासह शिक्षकांचा’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.

(Image Credit Source: Live Trends News)

सुप्रसिद्ध साहित्यिक तथा के.सी.ई. सोसायटीच्या प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी लिखित ‘शोध : शिक्षणासह माणसांचा ‘ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ शनिवार दिनांक १५ जुलै रोजी जळगाव येथे ए.टी.झांबरे विद्यालयात उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के. सी. ई. सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपिठावर प्रमुख अतिथी मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे (ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय ),मुख्याध्यापिका धनश्री फालक (गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर ),अथर्व प्रकाशनाचे संचालक युवराज माळी, कुमुद प्रकाशनाच्या संचालिका सौ.संगीता माळी,मुख्याध्यापिका श्रीमती अर्चना नेमाडे ( किलबिल बालक विद्यामंदिर ) मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी पुस्तकाचे प्रकाशन माजी मुख्याध्यापिका रेखा पाटील ( प.वि. पाटील प्राथमिक विद्या मंदिर ) यांच्या शुभहस्ते झाले. प्रकाशनपर मार्गदर्शनात श्रीमती रेखा पाटील म्हणाल्या की, ”अभ्यासक्रम आणि शालाबाह्य उपक्रम यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचं अव्दैत चन्द्रकान्त भंडारी सरांनी शोधः शिक्षणासह माणसांचा ग्रंथातून सुबोधपणे उलगडले.”

लेखकीय मनोगत मांडतांना चंद्रकांत भंडारी म्हणाले की, ”के.सी.ई.सोसायटीचे संस्थाध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांनी १४ वर्षे निरंतर मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले त्यामुळेच मला ‘गल्ली तुमची,पालक सभा आमची’ आणि ‘कुटुंब तुमचे, प्रबोधन आमचे ‘ हे शाळा – अभ्यास – संस्कार असे बिन खर्चिक व समाजाजवळ नेणारे उपक्रम यशस्वीपणे राबविता आले. तत्कालीन मुख्याध्यापिका श्रीमती रेखा पाटील व सौभाग्यवती सुनिता भंडारी यांचे अमूल्य योगदान तसेच हजारो पालक , शेकडो बालक आणि शिक्षकांचे अमूल्य सहकार्य मला वेळोवेळी मिळाले. अथर्व प्रकाशनाचे युवराज माळी यांनी मांडणी,मुखपृष्ठ यात जीव ओतल्याने पुस्तकाची निर्मिती देखणी व दर्जेदार झाल्याची कृतज्ञता भंडारींनी व्यक्त केली.

मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे मनोगतात म्हणाल्या की, ”पालक,शिक्षक व विद्यार्थी यांना भंडारी सर लिखित ग्रंथ अत्यंत उपयुक्त आहे.या ग्रंथांचे क्रमशः वाचन विद्यार्थ्यांकडून शिक्षकांनी वर्गात करून घ्यावे तसेच शालेय यु ट्युब चॅनेलवर ग्रंथाचे अभिवाचन प्रसारित करूनही पालकांपर्यंत थेट पोहोचवावे” असे विनम्र आवाहन केले.

शशिकांत वडोदकर आपल्या अध्यक्षीय मनोगतात म्हणाले की, भंडारी सर क्षणोक्षणी आणि पदोपदी माणुसकीचा शोध घेत प्रेम अर्पण करतात.चन्द्रकान्त भंडारी सरांची ध्येध्यासक्ती, अखंड दातृत्वशीलता आणि स्वानंदमग्नतेच्या गौरवार्थ वडोदकरांनी पहचान चित्रपटातील ’ बस यही अपराध मै | हर बार करता हूँ | आदमी हूँ आदमी से, प्यार करता हूँ ॥ या गाण्याचा चपखल संदर्भ देत आपल्या तरल संवेदनशीलता व गुणग्राहकतेचाही परिचय नकळत दिला ! तर भंडारी सरांनी पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रेमाचा नंदादीप कायम ठेवावा असे आवाहन देखील केले.

या कार्यक्रमात पुस्तकाचे प्रकाशक तथा अथर्व प्रकाशनाचे संचालक युवराज माळी व त्यांच्या पत्नी संगीता माळी उभयतांचा सत्कार लेखक चंद्रकांत भंडारी यांच्या पत्नी सौ.सुनीता भंडारी उभयतांनी शाल श्रीफळ देऊन केला.भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीतर्फे शाल,श्रीफळ व ग्रंथ देऊन लेखक चंद्रकांत भंडारी व सुनीता भंडारी दाम्पत्याचा सत्कार पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हाप्रमुख विजय लुल्हे यांनी केला.

प्रकाशन समारंभाचे उत्सवमूर्ती तथा लेखक चन्द्रकान्त भंडारी व त्यांच्या अक्षय लेखन ऊर्जा अन् उपक्रमांच्या अजोड सहयोगी सौ.सुनिता भंडारी प्रकाशन समारंभ वगळता संपूर्ण कार्यक्रम व्यासपीठावर विराजमान न होता अखेरपर्यंत श्रोत्यांमध्ये बसले ही बाब लक्षणीय ठरली. प्रस्तावना ,सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन चंद्रकांत भंडारी यांनी स्वतःच केले .विनम्रपणे भंडारी यांनी सहजतेन कोणताही अभिनिवेश न आणता कार्यक्रम सुत्रबद्धपणे यशस्वी केला ! परिणामी भंडारी दाम्पत्याच्या विनयशीलतेची चर्चा आदराने सर्वतोमुखी झाली !

भंडारी सरांच्या एकहाती अनोख्या कार्यवाहीने कार्यक्रम ऐतिहासिक व संस्मरणीय ठरला.कार्यक्रमास ऐ.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय ,गुरुवर्य प.वि.पाटील पाटील प्राथमिक विद्या मंदिर,किलबिल बालक विद्यामंदिर या शाळांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content