यावल-अय्यूब पटेल | राज्य शासनाने जाहीर केलेल्या नियोजीत केळी विकास महामंडळाला दिवंगत नेते कृषीमित्र स्व. हरीभाऊ जावळे यांचे नाव देण्यात येणार असून आपण याबाबत कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मांडून संमत करणार असल्याची महत्वाची घोषणा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केली. ते येथील कार्यक्रमात बोलत होते.
राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते शनिवारी सुमारे दोन कोटी रूपयांच्या विकासकामांचे भूमिपुजन करण्यात आले. या कार्यक्रमानंतर श्री गजानन महाराज मंदिरात महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्यावतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या खास शैलीत विरोधकांवर जोरदार टिका करतांनाच केंद्र व राज्य सरकारने केलेल्या कामांची प्रशंसा केली.
याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मी पाठपुरावा केल्याने राज्यासाठी केळी विकास महामंडळ स्थापन करण्यात येत आहे. या नियोजीत महामंडळाला तब्बल १०० कोटी रूपयाचा निधी प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केली आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. या नियोजीत महामंडळाला दिवंगत हरीभाऊ जावळे यांचे नाव देण्यात येणार असून यासाठी आपण मंत्रीमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडून याला मंजुरी मिळवणार असल्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केली. याप्रसंगी टाळ्यांच्या कडकडाटात ना. गुलाबराव पाटील यांच्या या घोषणेचे स्वागत करण्यात आले.
दिवंगत खासदार व आमदार तथा भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष हरीभाऊ जावळे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत सातत्याने जल, जमीन, जंगल यांचा विचार केला. केळीबाबत त्यांनी केंद्रीय पातळीवर समस्यांचे निवारण करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. केळीच्या समस्यांची जाण असणारे आणि यासाठी पाठपुरावा करणारे नेते म्हणून त्यांची ख्याती होती. यामुळे नियोजीत केळी विकास महामंडळ हे त्यांच्याच नावाने स्थापन करण्यात यावे अशी अनेकांची मनोमन इच्छा होती. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी याबाबत घोषणा केल्याने आता नवीन नामकरणासह केळी विकास महामंडळ हे लवकरच मूर्त स्वरूपात साकार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.